रामायण आणि महाभारत महायुद्ध अन् कलियुगातील आगामी तिसरे महायुद्ध यांतील भेद

‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अनेक द्रष्ट्या संतांनी वर्तवलेल्या भाकितानुसार लवकरच तिसर्‍या महायुद्धाला प्रारंभ होणार आहे. त्रेतायुगात श्रीराम – रावण आणि द्वापरयुगात कौरव – पांडव यांच्यात महायुद्ध झाले होते. ‘त्या महायुद्धात आणि लवकरच कलियुगात होणार्‍या तिसर्‍या महायुद्धात काय भेद आहे ?’, असा मनात विचार आला. त्या वेळी गुरुदेवांच्या कृपेने खालील भेद लक्षात आला.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. रामायणातील युद्ध लंकेत आणि महाभारतातील युद्ध हे कुरुक्षेत्रावर लढले गेले. कलियुगातील आगामी तिसरे महायुद्ध हे जगभर लढले जाणार असल्यामुळे त्यात अपरिमित जीवित हानी होणार आहे.

२. रामायण आणि महाभारत या वेळी लढणारे योद्धे धर्माचरणाने वागत होते. त्या वेळी युद्धाचे काही नियम होते, उदा. महाभारताच्या वेळी युद्ध सूर्योदयाला चालू होऊन सूर्यास्ताच्या वेळी संपणे, निःशस्त्र योद्ध्यावर वार न करणे इत्यादी; परंतु कलियुगामध्ये सर्वत्र अधर्म पसरल्यामुळे अत्यंत कपटाने आणि कूट कारस्थानांनी युद्ध लढले जाणार आहे. त्यामुळे ते महाविनाशकारी असणार आहे.

३. रामायण आणि महाभारत या वेळी झालेल्या महायुद्धाची झळ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचली नव्हती; परंतु कलियुगातील आगामी तिसर्‍या महायुद्धाची झळ जवळपास प्रत्येकापर्यंतच पोचणार आहे. यात सर्व जगच होरपळून निघेल.

४. त्रेता आणि द्वापार युगांतील महायुद्धात मानवाला श्रीविष्णूचे अवतार असलेले श्रीराम अन् श्रीकृष्ण यांनी तारले. तसेच कलियुगातील आगामी तिसर्‍या महायुद्धात जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे मानवाला श्रीविष्णूचे अवतार असलेले सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले तारणार आहेत. त्यांच्या या दिव्य कार्यात खारीचा वाटा उचलून आपण आपल्या जीवनाचे सार्थक करून घेऊया !

परात्पर गुरुदेवांनी सुचवलेले विचार त्यांच्या चरणी अर्पण ! इदं न मम ।

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.४.२०२१)