भारताच्या स्थलसेनेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या पदांसाठी होणार्या भरती प्रक्रियेच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडून काहीजण ती व्हॉट्सअॅपवरून वेगवेगळ्या खासगी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्रप्रमुखांना मोठ्या रकमेला विकत होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या सैन्यदलातील वरिष्ठ अधिकार्यांसह ९ जणांना अटक करण्यात आली. हे अधिकारी वरील प्रक्रिया राबवणार्या सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख आहेत. तसेच तमिळनाडू येथील सैन्यातील आणि देहलीतील अधिकारीही सहभागी आहेत. देशात अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार आहे, याचा कटू अनुभव आपण प्रतिदिन घेतच आहोत; परंतु सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी आणि वेगवेगळ्या ठिकाणचे अधिकारी भ्रष्ट असणे, हे देशासाठी अतिशय चिंताजनक अन् घातक आहे.
‘पैशाच्या हव्यासापोटी आपण काय करत आहोत’, याचे भान या अधिकार्यांना नाही. गलेलठ्ठ रकमेला प्रश्नपत्रिका विकून यातून चार पैसे कमावणे योग्य कि देशाशी प्रामाणिक रहाणे योग्य ? हा विवेक नष्ट झाला आहे, हेच यातून अधोरेखित होते. भरती प्रक्रियेच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका काही जणांना अगोदर मिळते, यातून जे प्रामाणिकपणे आणि सर्वस्व पणाला लावून कष्ट करून अभ्यास करतात, अशा विद्यार्थ्यांची हानी होते, ही दुसरी बाजू अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारच्या कृती होत राहिल्यास अभ्यास करण्याला अर्थ नाही, अशी प्रतिमा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका मिळवून उत्तीर्ण झालेली मुले खरेच देशाचे रक्षण करतील का ? ते देशाशी एकनिष्ठ रहातील का ? यातून देशाची प्रगती होणार कि अधोगती ? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
वरिष्ठ अधिकारीच अशा प्रकारची कृती करायला लागले, तर त्यांच्या हाताखालचे अधिकारी कशा प्रकारे वागत असतील ? याचा विचारच न केलेला बरा ! एकूण काय भ्रष्टाचार संपवण्यासाठी सर्वच स्तरांवर कठोर प्रयत्न होणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव आणि जनतेची पराभूत मानसिकता पहाता भ्रष्टाचार संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राची अनिवार्यता यातून अधोरेखित होते !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे