सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा मेळावलीवासियांचा निर्णय

प्रतीकात्मक छायाचित्र

पणजी – आयआयटी प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या भूमीचा मालकीहक्क सरकारकडे आहे, तो मागे घेतल्याविना आणि ग्रामस्थांच्या विरोधातील पोलिसांत नोंद केलेले खटले मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, असा निर्णय मेळावलीच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.

गोवा सरकारने ही भूमी आयआयटीच्या नावे केली आहे. या भूमीवरील आयआयटी प्रकल्प रहित केल्याविषयी आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानतो; पण त्यांनी आमच्या मागण्या मान्य करीपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. १/१४ उतार्‍यात पुन्हा ग्रामस्थांची नावे घातली जावीत. सत्तरी तालुक्यातील सर्व गावांतील ग्रामस्थांच्या भूमालकी हक्काची प्रकरणे सरकारने लवकरात लवकर मार्गी लावावीत, अशी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे.