अवैध धंद्यांशी निगडित असलेल्या उमेदवाराला मतदारांनी नाकारावे !

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग’चे स्तुत्य आवाहन !

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे हे पक्ष उतरले आहेत. गावपातळीवर पक्षाची अधिकृत निशाणी नसली, तरी पक्षाच्या वतीने पॅनेल उभे करून प्रचार चालू आहे. या वेळच्या निवडणुकीत ज्या पक्षाचे उमेदवार अवैद्य मद्य व्यवसायाशी निगडित आहेत त्यांना मत देऊ नका. ज्यांच्या घरातील व्यक्ती अवैध मद्य व्यवसायात आहेत, तसेच अवैध मद्याच्या पैशावर जे राजकारण करत आहेत, त्यांनी आपली तरुण पिढी उद्ध्वस्त केली आहे. अशा उमेदवारांना किंवा त्यांच्या या भाऊबंदांना मतदान न करता निवडणुकीतून हद्दपार करावे. स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग’ वृत्तवाहिनीच्या वतीने करण्यात आले आहे. (लोकशाहीत असे आवाहन करावे लागणे, ही नामुष्की आहे ! अवैध पार्श्‍वभूमी असलेल्यांना उमेदवारीच मिळू नये, अशी व्यवस्था हवी ! – संपादक)

‘अवैध मार्गाने मिळवलेल्या पैशांचा वापर करून निवडणुका जिंकून अवैध धंदे राजरोसपणे चालवण्याची त्यांना अनुमती मिळणार नाही’, याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यायची आहे, असे ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग’ने म्हटले आहे.