पणजी – मराठीला राजभाषेचा दर्जा द्या अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडू, अशी चेतावणी ‘मराठी राजभाषा आंदोलन’ या संघटनेने शासनाला दिली आहे. मराठी राजभाषा आंदोलनाच्या मुरगाव विभागाने आयोजित केलेल्या बैठकीत ही चेतावणी देण्यात आली.
या बैठकीत ‘मराठी राजभाषा आंदोलन’ संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, ‘‘गोव्यात गेली ६० वर्षे मराठी भाषेचा वापर होत आहे, तरीही मराठीवर अन्याय होत आहे.’’ या बैठकीत ‘मराठी राजभाषा प्रस्थापन समिती’चे अध्यक्ष श्री. गो.रा. ढवळीकर, ‘गोमंतक मराठी अकादमी’चे अध्यक्ष श्री. प्रदीप घाडी आमोणकर, मराठीप्रेमी तथा व्यावसायिक श्री. चंद्रकांत गावस, सौ. अर्चना कोचरेकर, श्री. मोहन डिचोलकर, श्री. मच्छिंद्र च्यारी आदींनी उपस्थितांना संबोधित केले. मराठीप्रेमींनी गतवर्षी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मराठीला राजभाषेेचा दर्जा देण्याविषयीचे निवेदन दिले होते; मात्र मुख्यमंत्र्यांनी याविषयी काहीच कारवाई न केल्याने बैठकीत याविषयी अप्रसन्नता व्यक्त झाली.