५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘इंडियन पॅनोरमा’तील चित्रपटांची घोषणा

मराठी भाषेतील ३ चित्रपट आणि ३ लघुपट सूचीत

पणजी, २१ डिसेंबर (वार्ता.) – केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘इंडियन पॅनोरमा’तील चित्रपटांची घोषणा केली आहे. या सूचीमध्ये ३ मराठी चित्रपट आणि ३ मराठी लघुपट यांचा समावेश आहे.

​निवड झालेल्या सूचीत वैभव किश्ती आणि सुहृद गोडबोले दिग्दर्शित ‘जून’, शशांक उडापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ आणि मंगेश जोशी दिग्दर्शित ‘कारखानिसांची वारी’ हे मराठी चित्रपट, तसेच राज मोरे दिग्दर्शित ‘खिसा’, हिमांशू सिंह दिग्दर्शित ‘पांढरा चिवडा’ आणि ॐकार दिवाडकर दिग्दर्शित ‘स्टील अलाईव्ह’ या मराठी लघुपटांचा समावेश आहे. या वर्षी ५ मल्ल्याळम् चित्रपट आणि एक मल्ल्याळम् लघुपट, तसेच आसामी, बंगाली, छत्तीसगढी, इंग्रजी, हिंदी, कन्नड, मणिपुरी, उडिया, तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषिक चित्रपटांचाही समावेश आहे. या सूचीत ‘नमो’ या संस्कृत चित्रपटाचाही समावेश आहे. तसेच इंग्रजी, हिंदी, नेपाळी, मणिपुरी, गुजराती आणि बंगाली भाषिक लघुपटांचा समावेश आहे.