आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात ८ युवकांचा मृत्यू !

सातारा, २५ मे (वार्ता.) – रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात २४ मेच्या मध्यरात्री स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला. यामध्ये ८ युवकांचा मृत्यू झाला आहे. अवघड वळणावर वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी खोल दरीत कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच रायगड आणि सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’ (गिर्यारोहक), ‘प्रतापगड रेस्क्यू टीम’ (आपत्कालीन बचाव पथक), महाड आणि पोलादपूर येथील ‘ट्रेकर्स’ संस्थांसह स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या अंधारातच दरीत उतरून तात्काळ शोध मोहीम आणि साहाय्यता कार्य चालू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर अपघातग्रस्तांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. प्रशासकीय सोपस्कार गतिमान करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. आतापर्यंत ३ मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांपैकी एक जण चिपळूण येथील, तर ७ जण कोरेगाव येथील असल्याचे समजते.