गोव्याच्या आध्यात्मिक वाटचालीतील एक सुवर्ण क्षण ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

रामकृष्ण मिशन केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

रामकृष्ण मिशन केंद्राच्या फलकाचे अनावरण करतांना  डॉ. प्रमोद सावंत आणि अन्य मान्यवर

फोंडा – रामकृष्ण मिशन गोवा केंद्राचे भूमीपूजन हा केवळ वास्तूच्या पायाभरणीचा सोहळा नाही, तर गोव्याच्या आध्यात्मिक सामाजिक वाटचालीतील एक सुवर्ण क्षण आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गोमंतक भूमीमध्ये रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून एक नवीन सेवा कार्याला आरंभ होत आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. खंडेपार येथे ‘रामकृष्ण मिशन गोवा केंद्रा’चे भूमीपूजन डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी रामकृष्ठ मठ आणि रामकृष्ण मिशन यांचे उपध्यक्ष स्वामी सुहितानंदजी महाराज, रामकृष्ण गोवा मिशनचे सचिव स्वामी आर्यानंदजी महाराज आदी उपस्थित होते.

या वेळी डॉ. सावंत म्हणाले की, 

१. स्वामी विवेकानंद यांनी ‘शिवाभावे जीव सेवा’ (प्रत्येक मानवामध्ये ईश्‍वाराचा अंश आहे) अशी शिकवण दिली होती. रामकृष्ण मिशन गेली सव्वाशे वर्षाहून अधिक काळ हा वारसा जोपासत आले आहे.

२. गोव्यामध्ये ‘सन (सूर्य) , सँड (वाळू) आणि सी (समुद्र)’ या ३ गोष्टींसाठी लोक येत होते; पण त्याला माझ्या सरकारने मुद्दाम ‘स्पिरिच्युएलिटी’ (अध्यात्म) हा चौथा ‘स’ जोडला आहे.

३. अध्यात्माच्या माध्यमातून गोमंतकामध्ये पुष्कळ मोठे कार्य चालू आहे. ते केवळ सरकार करते, असे नव्हे, तर वेगवेगळ्या मठाचे मठाधीश, तसेच वेगवेगळ्या मंदिरांमधून हे कार्य चालू आहे.

४. हा प्रकल्प गोव्याच्या पुढील १०० वर्षांच्या आध्यात्मिक प्रगतीचा पाया आहे. सांस्कृतिक आणि मूल्य आधारित विकासासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

रामकृष्ण मिशन गोवा केंद्राचे वैशिष्ट्य

हा प्रकल्प अध्यात्म, शिक्षण, समाजसेवा आणि मूल्याधारित विकास यांचे एक परिवर्तनकारी केंद्र म्हणून असेल. या केंद्राच्या उभारणीमागे स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेण्यात आली आहे. या अत्याधुनिक केंद्राच्या उभारणीसाठी ७ कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. या वास्तूमध्ये विविध विभाग असतील. यामध्ये ‘विवेकानंद भवन’, ‘शारदा भवन’ आणि ‘स्वामी ब्रह्मानंद भवन’ यांचा समावेश असेल.