पंढरपूर ‘कॉरिडॉर’चा ४ सहस्र कोटी रुपयांचा आराखडा संमत !

(कॉरिडॉर म्हणजे सुसज्ज आणि प्रशस्त मार्ग)

मुंबई – राज्य मंत्रीमंडळाच्या शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर येथील महत्त्वाकांक्षी कॉरिडॉर (सुसज्ज आणि प्रशस्त मार्ग) प्रकल्प आणि विकास आराखडा संमत करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत चंद्रभागा नदीचा घाट परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. ४ सहस्र कोटी रुपयांचा हा आराखडा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेखाली ही बैठक पार पडली. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार समाधान आवताडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

१. या प्रकल्पाच्या अंतर्गत चंद्रभागा नदीची स्वच्छता करून घाटांचे सुशोभीकरण करणे, मंदिराकडे जाणार्‍या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करणे, भक्त निवासाचे अद्ययावतीकरण करणे, दर्शन रांगेच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि विश्रांतीची व्यवस्था करणे आदी कामे केली जाणार आहेत.

२. भाविकांना दर्शनासाठी लागणारा काही घंट्यांचा वेळ न्यून व्हावा, यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था अधिक सुलभ करण्यात येणार आहे.

३. या प्रकल्पामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे.

४. भाविकांसाठी रुंद आणि सुरक्षित दर्शनमार्ग, गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष कॉरिडॉर, आधुनिक सुविधा, स्वच्छता व्यवस्था, वाहनतळ, निवासव्यवस्था आणि मूलभूत सुविधा आदी विकासकामे केली जाणार आहेत.

५. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया १ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची सूचना दिली आहे.

‘या ‘कॉरिडॉर’मुळे मंदिरातील काही दुकानांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे काही दुकानदारांनी प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. याविषयी दुकाने आणि घरे यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करण्यात येईल, तसेच विकास करतांना धार्मिकता जपली जाईल’, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.