‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गड-किल्ले स्वच्छता आणि संवर्धन’ मोहिमेचा नव्या ब्रीदवाक्याद्वारे शुभारंभ !

 ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ नवे ब्रीदवाक्य !

शुभारंभ करतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर

मुंबई – ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन’ या मोहिमेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गड-किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहिमे’चे ब्रीदवाक्य आता ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’, असे असणार आहे. या शुभारंभाच्या प्रसंगी मा. परिवहनमंत्री प्रतापजी सरनाईक, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशजी कदम, माजी खासदार राहुल शेवाळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

१. स्वच्छता मोहीम गडदुर्गांच्या परिसरात कार्यरत असणार्‍या सामाजिक संस्थांच्या साहाय्याने चालवली जाणार आहे. गडदुर्गांवर पर्यटकांच्या संख्या वाढत असल्याने निर्माण होणार्‍या प्लास्टिक कचर्‍याचे संकलन आणि पुनर्चक्रण करून सामाजिक संस्थांच्या साहाय्याने गडदुर्गांची प्रत्येक महिन्याला स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मोहिमेत करण्यात येणार आहे.

२. ‘उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रायगडावर लवकरच आयोजित केला जाणार आहे’, असे मंडळाचे अध्यक्ष श्री. सिद्धेश कदम यांनी सांगितले.

३. ‘एकूण ११ गडदुर्गांची स्वच्छता राखून ऐतिहासिक दर्जा जतन करण्यासह सभोवतालच्या पर्यावरणाचेही संवर्धन केले जाईल’, असे मंडळाचे सदस्य सचिव एम्. देवेंदर सिंह म्हणाले.