डिजिटल जनगणनेच्या पहिल्या टप्प्याच्या पूर्वचाचणीला गोव्यात प्रारंभ

पणजी, २ नोव्हेंबर (वार्ता.) – लोकसंख्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याच्या पूर्वचाचणीला गोव्यात प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत देशभरात डिजिटल स्वयंमाहिती नोंदणी (सेल्फ-एन्युमरेशन) प्रणालीची कार्यक्षमता तपासण्याचा प्रयोग चालू झाला आहे. या प्रयोगामध्ये गोव्याचाही समावेश आहे. गोव्यात पेडणे तालुक्यात कोरगाव गावात, तसेच मडगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ या २ ठिकाणी गणक (एन्युमरेटर्स) नागरिकांना त्यांच्या घरगुती माहितीची नोंद ऑनलाईन करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. ही प्रक्रिया १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत राबवली जात आहे. या भागांतील रहिवासी test.census.gov.in/se या संकेतस्थळावर लॉग इन करून स्वतःची माहिती भरू शकतात.

ही भारताची पहिली संपूर्णपणे डिजिटल जनगणना ठरणार आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील गृहसंख्या आणि गृहनिर्मिती जनगणनेसाठी विकसित केलेले संकेतस्थळ अन् भ्रमणभाष ॲप सध्या चाचणी स्वरूपात आहेत. क्षेत्रीय परिस्थिती, वापराची सुलभता आणि प्रवेशक्षमता पडताळल्यानंतरच त्यांचा व्यापक प्रसार केला जाणार आहे.

पूर्वचाचणीच्या वेळी विचारले जाणार अनुमाने ३० प्रश्न

पूर्वचाचणीच्या वेळी पुढील अनुमाने ३० प्रश्न विचारले जाणार आहेत. इमारत आणि घर यांचा क्रमांक, बांधकामासाठी वापरलेले साहित्य, घरप्रमुखाची माहिती, घरातील सदस्यांची संख्या, पिण्याच्या पाण्याचा स्रोत, वीज, शौचालय, स्वयंपाकासाठी वापरलेले इंधन, तसेच वाहन अन् उपकरण यांचे मालकी हक्क आदी सूत्रांचा समावेश आहे. घरात मुख्य वापरात असलेला धान्याचा प्रकार आणि भ्रमणभाष नंतर नोंद केला जाणार आहे.

संबंधित अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने उत्तर आणि दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी यांना प्रधान जनगणना अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. जनगणना संचालनालयाने (डिसीओ – डायरेक्टरेट ऑफ सेन्सस ऑपरेशन) या प्रक्रियेसाठी २७ शिक्षक आणि सरकारी कर्मचारी यांची गणक अन् पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ही पूर्वचाचणी २ भागांत केली जाणार आहे. १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत गणक (एन्युमरेटर्स) निवडलेल्या घरांना पोर्टलवरील (संकेतस्थळावरील) प्रवेश माहिती देऊन स्वयंनोंदणीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. १० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ते पुन्हा भेट देऊन ऑनलाईन भरलेली माहिती पडताळणार आहेत आणि उर्वरित घरांची गणना पूर्ण करणार आहेत. या दुसर्‍या भेटीच्या वेळी स्वयंनोंदणीतील माहिती जनगणनेच्या भ्रमणभाष ॲपमध्ये परावर्तीत होईल. दोन्ही प्रकार ‘जनगणना व्यवस्थापन आणि देखरेख प्रणाली’शी जोडलेले असणार आहेत. ही पूर्वचाचणी प्रश्नावली, डिजिटल माहिती (डेटा) संकलन प्रणाली, प्रशिक्षण पद्धत, लॉजिस्टिक्स (पुरवठा साखळी व्यवस्थापन) आणि संपूर्ण क्षेत्रीय सिद्धतेची तपासणी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या चाचणीचे निष्कर्ष राष्ट्रीय स्तरावरील जनगणना प्रक्रियेस सुधारण्यासाठी वापरले जाणार आहेत.

जनगणना २०२७ दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत सर्व इमारती आणि निवासस्थाने यांचा समावेश असलेली गृह-सूचीकरण प्रक्रिया केली जाणार आहे, तर फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या जनगणनेत प्रत्येक घरातील सर्व सदस्यांची जात नोंदवली जाणार आहे.