
पुणे – ‘मंगेशकर कुटुंबियांकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळणे, हे एका संगीत साधकासाठी अतिशय मोलाचे आहे. त्यामुळे ‘लता मंगेशकर संगीत सेवा’ या पुरस्कारासाठी मी स्वतःला अतिशय भाग्यशाली समजतो. सर्वाेत्तमाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा ध्यास प्रत्येक संगीत साधकाचा असतो, माझाही तोच प्रयत्न आहे, अशी भावना शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली. लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त यंदाच्या वर्षापासून ‘लता मंगेशकर संगीत सेवा’ पुरस्काराचा आरंभ करण्यात आला आहे. हा पहिला पुरस्कार यंदा देशपांडे यांना एम्.आय.टी. विश्वशांती विद्यापिठाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर आदी उपस्थित होते.
पंडित मंगेशकर म्हणाले, ‘‘लतादीदी आपल्यातच आहेत, अशीच भावना मंगेशकर कुटुंबियांची आणि चाहत्यांची होती. त्यामुळेच गेली २ वर्षे आम्ही कोणताही पुण्यस्मरणाचा कार्यक्रम केला नाही. जिथे जिथे संगीत आहे, तिथे तिथे लतादीदी असणारच त्यामुळे आजच्याही कार्यक्रमात लतादीदी उपस्थित आहेत, अशी माझी निश्चिती आहे.’’