‘Swastik’ And ‘Hackenkreuz’ Different : हिंदूंचे ‘स्वस्तिक’ आणि नाझींचे ‘हॅकेनक्रूझ’ यांच्यात भेद !

अमेरिकेच्या शिक्षण विभागाची मान्यता !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील ओरेगॉनच्या शिक्षण विभागाने हिंदूंचे पवित्र धार्मिक प्रतीक ‘स्वस्तिक’ आणि नाझींचे ‘हॅकेनक्रूझ’ यांच्यातील भेद अधिकृतपणे घोषित केला आहे. ‘स्वस्तिक’ आणि ‘हॅकेनक्रूझ’ यांच्यात बरेच साम्य असल्यामुळे काही जणांचा गोंधळ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ओरेगॉनच्या शिक्षण विभागाची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.


ओरेगॉनच्या शिक्षण विभागाने स्वस्तिकचे वर्णन ‘हिंदु, बौद्ध, यहुदी, जैन धर्म आणि काही मूळ अमेरिकी धर्म अन् संस्कृती यांमध्ये शुभ घटकांचे प्रतीक’, असे केले आहे. शिक्षण विभागाने म्हटले आहे की, आकड्यांचा आकार दिलेल्या क्रॉसच्या प्रतिमेला सामान्यतः ‘स्वस्तिक’ असे संबोधले जाते. (स्वस्तिक हे सहस्रो वर्षांपासून आहे, तर त्याच्याशी साधर्म्य असलेले ‘हॅकेनक्रूझ’ हे अलीकडचे आहे. स्वस्तिकला हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे, हेही भारतियांनी विदेशी नागरिकांना समजावून सांगितले पाहिजे ! – संपादक) याउलट नाझी आणि निओ-नाझी चिन्हाला ‘हॅकेनक्रूझ’ असे संबोधले जाते, जो ‘हुक्ड क्रॉस’साठी जर्मन शब्द आहे. नाझी जर्मन हुकूमशहा हिटलर याचे ‘हॅकेनक्रूझ हे चिन्ह ख्रिस्ती धर्माशी जोडलेले आहे. तेे ख्रिस्ती क्रॉसशी संबंधित प्रतीक आहे. त्यामुळे स्वस्तिकचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे अमेरिकेच्या शिक्षण विभागाने म्हटले आहे.

पवित्र स्वस्तिकाचे महत्त्व समाजात अधोरेखित करण्याचे काम यापुढेही चालूच राहील ! – हिंदु अमेरिकन फाऊंडेशन

‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’ने याचे वर्णन ‘ऐतिहासिक निर्णय’ असे केले आहे. फाऊंडेशनने पुढे म्हटले आहे की, ‘हिंदूंच्या पाठिंबा आणि समर्पण यांच्याविना हा विजय शक्य झाला नसता. भावी पिढ्यांसाठी हिंदूंच्या प्रतीकांचे पावित्र्य जपण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. पवित्र स्वस्तिकाचे महत्त्व समाजात अधोरेखित करण्याचे काम यापुढेही चालूच राहील.’’