परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर भीती दूर होऊन सरकत्या जिन्यावरून अलगदपणे जाता येणे

अधिवक्त्या (श्रीमती) श्रुती भट

१. फलाटावर जातांना सरकत्या जिन्याजवळ गेल्यावर जिन्याच्या पायरीवर एक पाऊलही टाकता न येणे

‘२०.१२.२०२३ या दिवशी मी सेवेनिमित्त दादर, मुंबईहून नाशिक येथे जाणार होते. त्यासाठी मी सकाळी ५.३० वाजता दादर रेल्वेस्थानकातील एका फलाटावर गेले. तेव्हा तेथे काही लोक ये-जा करत होते. ‘नाशिकला जाणारी रेल्वे फलाट क्रमांक १० वर येईल’, असे मला एका व्यक्तीने सांगितले. त्या फलाटावर मला सरकत्या जिन्याने जावे लागणार होते. मी सरकत्या जिन्याजवळ गेले, तेव्हा त्याचा वेग पाहून मला जिन्याच्या पायरीवर पाऊलही टाकता येत नव्हते. पूर्वी माझ्या समवेत कुणीतरी असायचे. त्यामुळे मी सरकत्या जिन्यावरून जाऊ शकले होते.

२. सरकत्या जिन्याच्या पायरीवर पाऊल ठेवतांना पडण्याची भीती वाटल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे आणि जिना चढतांना आणि उतरतांना जिन्याची गती लगेच न्यून होणे

मी एकटी असल्याने सरकत्या जिन्याच्या पायरीवर मला पाऊल ठेवतांना भीती वाटत होती. मी दोन वेळा जिन्यावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला; पण ‘मी पडेन’, असे वाटून मी पाऊल मागे घेत होते. मी ५ मिनिटे प्रयत्न करूनही मला ते जमत नव्हते. तेव्हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘तुम्हीच माझा हात धरा.’ तेव्हा काही सेकंदात सरकत्या जिन्याची गती लगेच न्यून झाली आणि मला जिन्याच्या पायरीवर सहजपणे पाऊल ठेवता आले. तसेच जिन्यावरून उतरतांनाही वेग पुष्कळ न्यून झाला आणि मी सहजपणे जिन्यावरून खाली उतरू शकले. त्यानंतर मी रेल्वेने प्रवास केला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला अलगदपणे सरकत्या जिन्यावरून नेले. हा प्रसंग मला दिवसभर आठवून श्री गुरूंच्या सामर्थ्याची जाणीव होऊन माझी भावजागृती होत होती. ‘परात्पर गुरु डॉक्टरांची अपार कृपा अनुभवता आली’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक