आंबोली येथे पोलिसांनी गोवंशियांची तस्करी रोखली

  • ९ गोवंशियांची वाहतूक केल्याच्या प्रकरणी ४ धर्मांधांवर गुन्हा नोंद

  • चारचाकी आणि ट्रक यांसह २९ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या कह्यात

सावंतवाडी – सावंतवाडी येथून कर्नाटकच्या दिशेने ९ गोवंशियांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी तालुक्यातील आंबोली येथील पोलीस तपासणी नाक्यावर पकडला. या वेळी २ लाख रुपयांचे गोवंश, तसेच ट्रक आणि ट्रकला मार्ग दाखवणारी इन्होवा कार यांसह २९ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी कह्यात घेतला. या प्रकरणी बेळगाव येथील ४ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले.
१६ जून या दिवशी सकाळी हा ट्रक आंबोलीमार्गे जात होता. ट्रकच्या हौदाला (हौद म्हणजे ट्रकमध्ये साहित्य ठेवण्यासाठी चालकाच्या मागे असलेली जागा) प्लास्टिक बांधून त्यात हे गोवंश कोंबले होते. यातील एक बैल घायाळ झाला होता. महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम, तसेच अन्य विविध कलमान्वये या प्रकरणातील सैफ अली अयुबहुसैन मडीवाले, अदनान रमजान बेपारी, नविद अली खान, महंमद अली खान पठाण आणि इसा बहुद्दीन बेपारी (बेळगाव, कर्नाटक) यांच्याविरुद्ध  गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गोवंशियांची तस्करी शासनाने थांबवावी ! – गोरक्षकांची मागणी

या घटनेची माहिती मिळताच गोरक्षकांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. आंबोली पोलीस तपासणी नाक्यापूर्वी या मार्गावर दाणोली येथे तपासणी नाका आहे. ‘दाणोली तपासणी नाक्यावरून हा ट्रक पुढे कसा गेला ?’, असा प्रश्न गोरक्षकांनी उपस्थित केला. शासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन गोतस्करीचे प्रकार तातडीने थांबवावेत, अशी मागणी उपस्थितांनी केली. सर्व गोवंशियांना गोवा राज्यातील सिकेरी येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे.