पालकांची लूट !

प्रतिकात्मक छायाचित्र

विद्येच्या मंदिरात पालक त्यांच्या पाल्यांना विश्वासाने विद्यार्जनासाठी पाठवतात. त्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे आणि आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, ही पालकांची सामान्य अपेक्षा असते. मागील काही वर्षांत सर्वत्र खासगी शिक्षण संस्थांचे पेव फुटले आहे. येथे विद्यादानाच्या नावाखाली सर्रासपणे शिक्षणाचा ‘व्यापार’ चालू आहे. या संस्था प्रतिवर्षी वेगवेगळ्या मार्गांनी पालकांच्या खिशावर डल्ला मारत असतात. शासकीय शाळेतील शिक्षकांना सरकारकडून अनेकदा शाळाबाह्य कामांसाठी जुंपले जाणे, शिकवण्याचा दर्जा खालचा असणे यांमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. परिणामी सर्व सुबत्ता असूनही सरकारी शाळेतील पट वर्षागणिक खालावला आहे. शिक्षकांच्या जागाही पूर्ण भरल्या जात नाहीत, ज्याचा परिणाम पुन्हा अभ्यासावर होतो. अनुदानित शाळांमध्येही आरक्षणाचा भाग वाढला आहे.

खासगी इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल अधिक प्रमाणात दिसतो; मात्र या इंग्रजी खासगी शिक्षणसंस्था पालकांना लुटण्याचे काम नियोजितपणे करत असतात. शाळेत सर्व सुविधा उपलब्ध असतांनाही अनेक खासगी शाळांकडून शालेय सुविधांच्या नावावर पालकांकडून सहस्रो रुपयांची विनापावती देणगी घेतली जाते. ८ ते ९ महिने चालणार्‍या अभ्यासक्रमाकरताही संपूर्ण वर्षभराचे अवास्तव शुल्क, तसेच लेखनसामुग्री, खेळाचे मैदान, सभागृह भाडे, वाचनालय भाडे, संगणक, बसभाडे आदी नावाने शुल्क आकारले जाते. परवडत नसतांनाही पाल्याच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून अनेक पालक पदरमोड करून आयुष्यभरात जमा केलेली रक्कम पाल्यांच्या शाळाप्रवेशात व्यय करतात, तर अनेक पालक कर्ज काढून शाळेचे शुल्क भरतात. विद्यार्थ्यांना ठराविक दुकानातून शालेय साहित्य आणि गणवेश घेणे बंधनकारक केले जाते. या दुकानात वारेमाप किमती सांगितल्या जातात, तसेच त्याचा दर्जाही काही वेळा हीन असतो. ही दुकाने बर्‍याचदा संस्थाचालकांच्या मालकीची किंवा त्यांच्या नातेवाइकांची असतात किंवा शिक्षणसंस्था चालकांना दलाली तरी मिळत असते. शाळेच्या वेळेनंतर सायंकाळी शिकवणीवर्ग भरवले जातात, त्यात येणे बंधनकारक केले जाते, त्यासाठी शुल्क आकारले जाते. स्नेहसंमेलन, खेळ महोत्सव, शैक्षणिक सहल, विज्ञान सहल, वार्षिक सहल ही कारणे सांगून पालकांना लुबाडणे वर्षभर चालू असते. विद्यार्थ्यांकडून वेळेत शुल्क न आल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न देणे, त्यांची नावे काळ्या सूचीत टाकणे, विद्यार्थ्यांना भरवर्गात अपमानास्पद वागणूक देणे यांसारखे प्रकार या खासगी शाळांतून सर्रासपणे चालतात. प्रत्येक खासगी शाळेने तिच्या लाभासाठी स्वतंत्र नियम सिद्ध केलेले असतात. त्यावर कुणाचेच बंधन नसते. शिक्षण विभाग अशांवर कारवाई करील का ?

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.