प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
‘हा प्रश्न पुष्कळ महत्त्वाचा आणि विचार करण्यासारखा आहे. ‘हिंदु धर्म हा प्राचीन आहे आणि त्याची मूल्येही शाश्वत आहेत’, असे जे प्रतिपादन केले जाते, ते १०० टक्के सत्य आहे. त्याचे आपण अनुयायी काहीशा दयनीय अवस्थेत आहोत, ही लाजिरवाणी गोष्टही नाकारता येत नाही. सकृत दर्शनी हा विरोधाभास धर्म आणि धर्मसंकल्पना यांचे अपयश वाटण्याचा संभव आहे. यासाठी सविस्तर चिंतन करणे आवश्यक आहे.
साधारणतः ज्ञात कालगणनेचा विचार करतांना हिंदूंच्या दयनीय अवस्थेचा तुलनात्मक अत्यल्प काळ आहे. इतिहासाचा विचार केला, तर मागील दोन ते अडीच सहस्र वर्षांपासून दयनीय अवस्था चालू झाली. तत्पूर्वी आपले राष्ट्र अतिशय तेजस्वी आणि समृद्ध होते. कल्पाचा विचार केला, तर सध्याचे श्वेतवाराह कल्प चालू होऊन आज वर्ष २०२४ मध्ये १९८ कोटी ६१ लाख २५ सहस्र १२५ इतकी वर्षे झाली. सध्याच्या या मन्वंतराचा विचार केला, तर वैवस्वत मनूच्या २८ व्या मन्वन्तराला आरंभ होऊन ३८ लाख ९३ सहस्र १२५ वर्षे झाली आहेत. त्यांपैकी ही अडीच सहस्र वर्षे, म्हणजे या मन्वंतरापैकी केवळ ०.०००६४२१ टक्के एवढा काळ आपली दैन्यावस्था आहे. उर्वरित काळ अत्यंत दैदिप्यमान आणि समृद्ध असाच होता. तरीसुद्धा ‘असे का झाले ?’, याचा विचार करणे आवश्यक आहे.
धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ।
तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् ।।
– मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक १५
अर्थ : धर्माचे आचरण न करणार्याला धर्म नष्ट करतो. धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म रक्षण करतो. म्हणून धर्माचा नाश करू नये. (आचरण करावे.) न पाळलेला धर्मच पुरुषाचा नाश करतो.
‘जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे धर्म रक्षण करतो’, या संदर्भात आज धर्माचे रक्षण आणि पालन कोण करतो ? याचे उत्तर देणे किंवा पचणे कठीण जाईल. सध्याच्या कलियुगाच्या प्रभावाने धर्माचे नेमके स्वरूप कळणेही अवघड झाले आहे.
१. काळानुरूप रूढींमध्ये पालट करणे शक्य !
सामान्यतः आपण काही रूढींना धर्म समजतो. धर्माच्या एखाद्या सिद्धांतावर आधारलेले आचरण परंपरेने रूढ होते. त्याला रूढी म्हणतात. देश-काल-परिस्थितीनुरूप त्यात काहीसा पालट होऊ शकतो. धर्माचे मूलभूत तत्त्व (अधिष्ठान) आणि परिस्थितीची सापेक्षता लक्षात आल्यानंतर रूढींमध्ये उचित पालट करता येऊ शकतात अन् धर्मामध्ये अशी मान्यता आहे. असा पालट करण्याचा अधिकार अर्थ आणि काम विषयक आसक्ती नसलेल्या विरक्त महात्म्यांना आहे.
हा विचार अशासाठी सांगितला की, हिंदु धर्म हा देश-काल-परिस्थितीचे भान ठेवणारा आहे. उचित पालट हे मान्य केले आहेत. अर्थात् याचा अर्थ ‘धर्म’ म्हणून मला सोयीचे वाटतील, ते पालट करायचे, असे कुणी समजू नये.
२. हिंदु धर्माचे तेज न्यून होण्यामागील कारण
विधर्मः परधर्मश्च आभास उपमा छलः ।
अधर्मशाखाः पञ्चेमा धर्मज्ञोऽधर्मवत् त्यजेत् ।।
– श्रीमद्भागवत, स्कंध ७, अध्याय १५, श्लोक १२
अर्थ : विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि छल या अधर्माच्या ५ शाखा आहेत. अधर्माप्रमाणेच या सर्वांचाच धर्म जाणणार्या पुरुषाने त्याग करावा.
असे ‘श्रीमद्भागवता’मध्ये म्हटले आहे. त्याचा थोडक्यात भावार्थ असा, ‘विधर्म (वर्म चुकलेला ज्याने स्वधर्माला बाध येतो), परधर्म (दुसर्याचा धर्म. येथे अन्य धर्म असा अर्थ नाही), आभास (तामस धर्म, भासमान – आपल्या आश्रमाहून वेगळ्या धर्माला माणूस स्वेच्छेने धर्म मानतो, तो ‘आभास’ होय.), उपमा (दांभिकतेने केलेला, ढोंगीपणा) आणि छल (शास्त्रवचनांचा विपरीत अथवा आपल्या सोयीचा अर्थ करून धर्मकृत्य करणे) हे धर्म वाटणारे अधार्मिक प्रकार टाळले पाहिजेत’, असे म्हटलेले आहे.
या संदर्भात आपले राष्ट्रीय दुर्दैव म्हणता येईल, अशी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जे व्यासपिठावरून निधर्मीवादाचा प्रचार करतात, ते व्यक्तीगत (खासगीत) धार्मिक असतात आणि जे व्यासपिठावरून धर्माचा जयजयकार करतात, ते व्यक्तीगत पातळीवर अधार्मिक असतात. अशा प्रकारच्या दांभिकतेमुळे हिंदु धर्माचे तेज न्यून होत चालले आहे.
३. हिंदु धर्म आचरण आणि प्रत्यक्ष कृती करण्याचा विषय
आपल्याकडे धर्मविषयक ‘आचारप्रभवो धर्मः ।’ म्हणजे ‘धर्म आचारातून निर्माण होतो’, असेही म्हटलेले आहे. याचा अर्थ ‘धर्म ही केवळ गप्पा मारणे आणि शब्दांचे फुलोरे निर्माण करून केवळ चर्चा करण्याचा विषय नसून तो आचरण अन् प्रत्यक्ष कृती करण्याचा विषय आहे.’
आज आपल्या समाजात धर्मग्लानी दिसून येते. धर्माची अवहेलना केलेली दिसते. या सगळ्याला आपणच कारणीभूत आणि उत्तरदायी आहोत. आपल्या धर्माची निंदा आपल्या लोकांनीच अधिक केलेली दिसते. या उलट अन्य धर्मातील विचारवंत हिंदु धर्माकडे अतिशय आदराने पहातांना दिसतात.’
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (वर्ष १९९८)
(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर)
धर्माच्या आधारावर सामाजिक समस्या किती प्रमाणात सुटू शकतील ?‘हिंदु धर्माच्या बांधणीचा मूळ हेतू ‘कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक अथवा सामाजिक समस्या निर्माण होऊ न देता विकासाकडे-समृद्धीकडे प्रगती व्हावी’, असा असल्यामुळे धर्माच्या आधारावर समस्या निर्माण होणारच नाहीत आणि ज्या काही किरकोळ असतील त्या सुटू शकतील. सामाजिक अथवा वैयक्तिक समस्या या कशामुळे निर्माण होतात ? याचा विचार केला, तर असे लक्षात येते की, ज्या ठिकाणी कुणाही दोन घटकांचा स्वार्थ किंवा जीविका, एक दुसर्यामुळे बाधित होण्याची वेळ येते किंवा शक्यता असते तिथे खरे प्रश्न वा समस्या निर्माण होतात. चातुर्वर्णाश्रम पद्धत समस्या निर्माण न होण्यासाठी निर्मिली गेली !आपल्या धर्मव्यवस्थेमध्ये स्वीकारलेली चातुर्वर्णाश्रम पद्धत ही अशा प्रकारचे प्रसंग येऊ नयेत, अशासाठी आखलेली आहे; परंतु आज चातुवर्ण्य ही संकल्पना कुणी नीट समजावून घेतांना दिसत नाही. समाजधारणेसाठी आवश्यक असणार्या ज्ञान, संरक्षण, व्यवहार आणि सेवाकार्ये या ४ सत्तांची वर्णव्यवस्था ही एक विकेंद्रित पद्धत आहे. ४ वर्णांमध्ये कुणी श्रेष्ठ अथवा कनिष्ठ धर्माने मानलेला नाही. सगळीकडे एकाच शरिराच्या अवयवाप्रमाणे हे समजावेत, असे म्हटले आहे; मात्र गेल्या २०० वर्षांच्या इतिहासात धर्माची मांडणी काहीशी विकृत केली गेल्याचे दिसते. काही व्यक्तींनी धर्ममर्यादांचे उल्लंघन करून अन्य वर्णाच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने वागवले. त्यामुळे विचारवंतांच्या धर्मविषयक संकल्पना चुकत गेल्या. काही व्यक्तींच्या चुकीच्या आचरणामुळे ‘धर्म चुकीचा’ म्हणणे हा विद्वेष !‘धर्माच्या नावाने काही व्यक्ती आचारण करतांना चुकल्या’, याचा अर्थ ‘धर्म चुकीचा’ असे म्हणता येणार नाही; परंतु आपल्याकडे दुर्दैवाने तसे झाले आणि या विचाराला पाश्चात्त्य विचारवंतांनी खतपाणी घालून विद्वेष निर्माण केला.’ – प.पू. स्वामी वरदानंद भारती (वर्ष १९९८) |