रत्नागिरी येथे ३ डिसेंबरला होणार हिंदु राष्ट्र-जागृती सभा

सभेचा विषय प्रत्येक हिंदुपर्यंत पोचवण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

रत्नागिरी येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या नियोजन बैठकीला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

रत्नागिरी, ११ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण देशभरात हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार, ३ डिसेंबर २०२२ या दिवशी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुति मंदिर, रत्नागिरी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची नियोजन बैठक १० नोव्हेंबर या दिवशी शहरातील श्री पतितपावन मंदिर येथे पार पडली. या बैठकीत हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा विषय प्रत्येक हिंदूपर्यंत पोचवण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला. सर्वच हिंदुत्वनिष्ठांनी सभेच्या नियोजनामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या बैठकीचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर बैठकीच्या प्रारंभी सभेचा उद्देश सांगतांना म्हणाले की, आज भारतात हिंदु धर्म आणि हिंदु धर्मियांवर अनेक आक्रमणे होत आहेत. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु स्त्रिया आणि युवती यांचे फसवून अथवा बळजोरीने धर्मांतरण करण्यात येत आहे. वेगवेगळी आमिषे दाखवून मिशनरी हिंदूंना धर्मांतरित करत आहेत. हिंदूंना पवित्र स्थानी असलेल्या गोमातांची खुलेआम हत्या केली जात आहे. हिंदूंचे साधूसंत, हिंदुत्वनिष्ठ नेते, हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर प्राणघातक आक्रमणे होत आहेत. देवस्थानांचे सरकारीकरण होऊन देवनिधीचा दुरुपयोग केला जात आहे. ‘लँड जिहाद’, हलाल जिहाद, वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जमिनीवर अवैध कब्जा करणे, गजवा-ए-हिंद (संपूर्ण भारताचे इस्लामीस्थान करण्याचे षड्यंत्र) यांसारख्या आक्रमणांची भर पडत आहे. या सगळ्यावर उपाय म्हणजे हिंदूंना जागृत आणि संघटित करणे ! त्यासाठी हिंदू राष्ट्र-जागृती सभा संपूर्ण देशभरात घेण्यात येत आहेत. रत्नागिरी येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराच्या माध्यमातून हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यासाठी अधिकाधिक हिंदूंनी सहभाग घ्यावा.

या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी सभेचा प्रसार, प्रत्यक्ष सभा आणि त्या अनुषंगाने आवश्यक सेवा यांमध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.

बैठकीला उपस्थित मान्यवर

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. राकेश नलावडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि गो सेवा संघ रत्नागिरीचे सर्वश्री गणेश गायकवाड, सुशील कदम, हिंदु राष्ट्र सेनेचे सर्वश्री चंद्रकांत राऊळ, गौरव पावसकर, अमित खटावकर, आम्ही फक्त शिवभक्त संघटनेचे सर्वश्री किरण जाधव, तन्मय जाधव, सुनित बेलवलकर, आदित्य कौजलगीकर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे रत्नागिरी शहराध्यक्ष श्री. तेजस साळवी, बजरंग दलचे श्री. विराज चव्हाण, इस्कॉनचे श्री. निमिष कार्तिक, शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, श्री मरुधर विष्णु समाजाचे सर्वश्री दीपक देवल, धनराज चौधरी, थानाराम प्रजापत, केवल सप्रे, सुहास नलावडे, संजय पावसकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विनय पानवळकर, महेश लाड, संजय जोशी, सनातन संस्थेच्या सौ. शुभांगी मुळ्ये.