फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे बेरोजगार हिंदु तरुणांना इस्लाम स्वीकारण्यास केले जात आहे बाध्य !

गलेलठ्ठ पगाराची नोकरी देण्याचे आमीष !

फतेहपूर (उत्तरप्रदेश) – येथे हिंदु तरुणांना प्रतिमास २ लाख रुपयांची नोकरी आणि अन्य सुविधा देऊन इस्लाम स्वीकारण्यास बाध्य केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाराणसी जिल्ह्यातील सुधांशू चौहान नावाच्या एका हिंदु तरुणाने धर्मांतर करण्यास स्पष्टपणे नकार दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

सुधांशू चौहान प्रकरणी पोलिसांनी केली कारवाई !

या प्रक्रियेतून सुधांशू चौहान हा तरुणही गेला; परंतु त्याने धर्मांतर करण्यास नकार दिल्याने त्याला मदरशातच डांबून त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. हा प्रकार समजताच सुधांशूच्या कुटुंबियांनी केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्याकडे तक्रार करून त्याला इस्लामी संघटनेच्या तावडीतून सोडवण्याची मागणी केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून फतेहपूरच्या लखनौ बायपास येथे एका घरात चालू  असलेल्या मदरशावर छापा टाकला. तेथून ३ मुसलमानांना अटक केली, तसेच तेथून सुधांशू चौधरी याची सुटका केली.

सुधांशूने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आस्थापनाचा मुख्य इकलाख, यासीन, घरमालक अलीम, मोहसीन, मौलवी, अरमान अली आदींच्या विरोधात बंधक बनवणे, अवैध धर्मांतर, धोका देणे आदी कृत्ये केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. मोहसीन, यासीन आणि आलिम यांना अटक करण्यात आली असून मौलवीसह अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.

असे केले जाते धर्मांतर !

१. बेरोजगार हिंदु तरुणांना इस्लाम स्वीकारण्यास बाध्य करण्यासाठी आधी एखाद्या मोठ्या आस्थापनामध्ये नोकरी, घर आणि लाखो रुपये कमावण्याचे वचन देऊन इस्लामी संघटनेचे सदस्य बनवले जाते.

२. जेव्हा हिंदु युवक संघटनेचा सदस्य बनतो, तेव्हा त्याला मदरशात नेले जाते. तेथील मौलवीच्या (इस्लामच्या धार्मिक नेत्याच्या) माध्यमातून हिंदु तरुणांना इस्लाम स्वीकारणे आणि त्याचा प्रचार करणे, यांसाठी एका आठवड्याचे प्रशिक्षण दिले जाते. या कालावधीत मौलवी हिंदु तरुणांचा बुद्धीभेद करण्यात यशस्वी होऊन त्यांना धर्मांतर करण्यास बाध्य करतो.

संपादकीय भूमिका

  • भाजपशासित उत्तरप्रदेशात धर्मांतरबंदी कायदा असतांनाही असे प्रकार घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने आता तरी धर्मांतरबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करून दोषींवर कठोर कारवाई करावी !
  • हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्यात धर्माभिमान नाही. त्यामुळे ते अन्य पंथियांच्या आमीषाला बळी पडतात. त्यामुळे हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदु संघटनांनी पुढकार घ्यावा !