भारताने कुठल्या सूत्रावर काय भूमिका घ्यायची, हे ठरवण्याचा अधिकार भारतालाच आहे. एखाद्याला आधी लढण्यासाठी प्रोत्साहित करायचे आणि नंतर प्रत्यक्ष युद्ध चालू झाल्यावर त्याला साहाय्य न करता मरण्यासाठी सोडून देऊन त्याचा विश्वासघात करायचा, अशी कृती भारताने कधी केली नाही, हे बायडेन यांना भारताने सुनावले पाहिजे ! – संपादक
वॉशिंग्टन (अमेरिका) – युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामध्ये संपूर्ण ‘नाटो’ (नॉर्थ अॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) आणि पॅसिफिक क्षेत्रात एक संयुक्त आघाडी राहिली. ‘क्वॉड’ देशांमधील भारताची भूमिका याविषयी काही प्रमाणात अस्थिर राहिली; परंतु जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी भक्कम भूमिका मांडली, असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारताच्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. युद्धामुळे अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले असतांनाही भारतीय तेल शुद्धीकरण आस्थापनांनी रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी चालूच ठेवल्यानंतर अमेरिकेकडून ही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
Biden calls India ‘somewhat shaky’ on punishing Russia for invasion of Ukraine https://t.co/Z5WtgQpeUI
— Republic (@republic) March 22, 2022
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितले की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाविषयी भारताने घेतलेल्या भूमिकेला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी पाठिंबा दर्शवला आहे. भारताची भूमिका ही हिंद-प्रशांत महासागरांच्या क्षेत्रातील लक्ष विचलित करण्याचे कारण ठरता कामा नये, यावर मॉरिसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतैक्य झाले. ‘युक्रेनविषयी भारताची भूमिका आम्ही समजू शकतो’, असेही मॉरिसन यांनी म्हटल्याचे शृंगला यांनी सांगितले.