मुंबईत ‘एम्.आय.एम्.’च्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त !

कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ताफ्यात १०० हून अधिक गाड्या

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबई – खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या चांदिवली येथे होणार्‍या सभेसाठी संभाजीनगरहून मुंबईत मोर्च्यासाठी येणार्‍या ‘एम्.आय.एम्.’च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. ‘एम्.आय.एम्.’च्या मोर्च्याला पोलिसांनी अनुमती दिलेली नाही. मालेगाव, धुळे येथून मुंबईत असलेल्या २५-३० कार्यकर्त्यांना चांदवड येथील मंगरूळ पथकर नाक्यावर पोलिसांनी कह्यात घेतले. मोर्च्यासाठी येणारे कार्यकर्ते मुंबईमध्ये प्रवेश करू नयेत, यासाठी मुंबईच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्यात आला होता. मुलुंड येथील आनंदनगर जकातनाका येथे नवघर पोलीस ठाण्याच्या पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीसही पहार्‍यासाठी उभे होते; पण खारघर पथकर नाक्याच्या ठिकाणी ‘एम्.आय.एम्.’च्या कार्यकर्त्यांच्या सर्व गाड्या आल्यावर पोलिसांनी तो ताफा अडवला आणि ‘एम्आय्एम्’चे इम्तियाज जलील यांच्याशी बोलून केवळ १०-१० गाड्या सोडण्याची अनुमती पोलिसांनी दिली. १०० हून अधिक गाड्या या ‘रॅली’मध्ये सहभागी झाल्या होत्या.

मानखुर्द येथे पोलिसांनी वाहनांचा ताफा अडवून काही वाहनांचे क्रमांक नोंदवून घेतले. या वेळी काही कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या. गाड्यांवर लावण्याचा आलेला भारताचा झेंडा पोलिसांनी काढायला लावला.