हिंदूंनी निर्भिडपणे नित्य धर्माचरण केल्यास त्यांना ईश्वराचा आशीर्वाद लाभेल ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था

श्री धन्वंतरी जयंती सोहळ्यात मार्गदर्शन करतांना वैद्य संजय गांधी आणि उपस्थित वैद्य

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), ७ नोव्हेंबर (वार्ता.) – प्रतिवर्षी ‘श्री धन्वंतरी जयंती’ साजरी करणे, हे समस्त वैद्यांसाठी धर्माचरण आहे. यामुळे वैद्यांवर श्री धन्वंतरी देवतेची निश्चितच कृपादृष्टी होईल. आजच्या दिवशी ‘श्री धन्वंतरये नम:’ हा नामजप केल्याने सहस्र पटीने फळ मिळते हिंदूंनी निर्भिडपणे धर्माचरण केल्यास त्यांना ईश्वराचा आशीर्वाद मिळेल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे साधक आणि वैद्य संजय गांधी यांनी केले. ‘मलकापूर शाहुवाडी तालुका वैद्यकीय संघटने’च्या वतीने श्री धन्वंतरी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. सर्वांनी त्यांच्या कपाळावर नेहमी टिळा लावावा. वाढदिवस तिथीनुसार साजरा करावा’, असे आवाहनही वैद्य गांधी यांनी या वेळी केले. या कार्यक्रमासाठी २४ जणांची उपस्थिती होती.

प्रारंभी रामरक्षा म्हणण्यात आली. त्यानंतर श्री धन्वंतरी देवतेचा नामजप करण्यात आला. नंतर शंखनाद करून आरती म्हणण्यात आली. वैद्यकीय संघटनेचे ज्येष्ठ वैद्य मनोहर पाटील, वैद्य भरत पाटील, तसेच संघटनेचे अध्यक्ष वैद्य गजानन पाटील यांच्या हस्ते धन्वंतरी देवतेचे पूजन करण्यात आले. वैद्यकीय संघटनेचे सदस्य वैद्य अभिजित यादव, वैद्य रवींद्र ठाणेकर, वैद्य महेश सुतार, वैद्य जयवंतराव पाटील, वैद्य नीलेश बसरे, वैद्य प्रशांत प्रभावळे, वैद्य मानकर वैद्य, आर्.एस्. रणवरे आदी यांसह वैद्या सौ. मोहिनी अंबिके, सौ. शुभलक्ष्मी पाटील, सौ. धन्वंतरी पाटील, सौ. अक्षता पाटील या उपस्थित होत्या.