हिंदूंना त्यांच्या शौर्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा सण म्हणजे दसरा ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती
निंबोडी (जिल्हा नगर) – हिंदूंच्या देवतांसमोर असुर हरले, तो दिवस म्हणजे विजयादशमी होय. हिंदूंना त्यांच्या शौर्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा सण म्हणजे दसरा !, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले. येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. संदीप खामकर यांनी आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीच्या सांगता कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शिवसेना नेते संदेश कार्ले, पंचायत समिती सभापती संदीप गुंड, माजी सभापती प्रवीण कोकाटे हे उपस्थित होते. दुर्गामाता दौड यशस्वी करण्यासाठी सर्वश्री संदीप खामकर, नागेश जाधव, परमेश्वर गायकवाड आणि अन्य धारकरी यांनी परिश्रम घेतले.
नगर येथे दुर्गामाता दौडीच्या समारोपप्रसंगी हिंदु धर्माच्या शत्रूंचा नाश करून देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाची शपथ !
नगर – येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाध्यक्ष बापू ठाणगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. दौडीच्या समारोपाच्या वेळी आमदार संग्रामभैय्या जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम, तसेच धारकरी उपस्थित होते. शस्त्रपूजन झाल्यानंतर विविध घोषणांनी, भारतमातेच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. हिंदु धर्म आणि हिंदुस्थान यांच्या शत्रूंचा नाश करून देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणाची शपथ या वेळी घेण्यात आली.