नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांचे अपील जिल्हाधिकार्‍यांनी फेटाळले !

निशिकांत पाटील

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात नाममात्र भाड्याने दिलेल्या मालमत्ता पुन्हा नगरपालिकेच्या कह्यात घेण्याचा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी वैध ठरवला आहे. नगराध्यक्षांच्या या निर्णयांना आव्हान देणारे अपील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रविष्ट केले होते. हे अपील जिल्हाधिकार्‍यांनी फेटाळले आहे. हा निकाल म्हणजे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कारभार्‍यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला चपराक आहे, असे मत विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार यांनी व्यक्त केले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने या निर्णयाला योग्य तेथे आव्हान दिले जाईल, असे सांगितले.

यापूर्वी पालिकेत जयंत पाटील यांची सत्ता असतांना तत्कालीन सत्ताधार्‍यांनी विविध मालमत्ता नाममात्र भाड्याने देण्याचा ठराव केला होता. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर सत्तांतर झाले. यानंतर संबंधित इमारती नगरपालिका कह्यात घेण्याचा ठराव नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी संमत केला होता. याकामी विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.