म्हापसा येथे रहाणार्‍या आणि रामनाथी आश्रमात येऊन साधना करणार्‍या सनातनच्या साधिका सौ. मीनाक्षी धुमाळ जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

म्हापसा (गोवा) येथे रहाणार्‍या आणि रामनाथी आश्रमात येऊन साधना करणार्‍या सनातनच्या साधिका सौ. मीनाक्षी धुमाळ (वय ५१ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

साधकजनांनी गुरुपौर्णिमेच्या दोन दिवसांपूर्वी श्रीगुरुकृपेने अनुभवला कृतज्ञताभावातील आनंद !

धन्य धन्य हम हो गये गुरुदेव ।
सेवा का भाग्य जो हमें दिया ।
साधक-संतों का जो सत्संग दिया ।।
शीघ्र उन्नति का मार्ग दिखाया ।
कृतज्ञता से हृदय भर आया ।।

सौ. मीनाक्षी धुमाळ (उजवीकडे) यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

रामनाथी (गोवा) – गुरुपौर्णिमा अवघ्या दोन दिवसांवर आली असल्याने सर्वच साधकजनांची गुरुचरणी जाण्याची तळमळ आणि उत्कंठा दिवसेंदिवस वृद्धींगत होत आहे. अशातच आषाढ शुक्ल पक्ष नवमी म्हणजे १८ जुलै या दिवशी ‘भूवैकुंठ’ असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधक गुरूंनी दिलेल्या आध्यात्मिक आनंदात न्हाऊन निघाले. गेल्या २२ वर्षांपासून प्रतिदिन साधारण ४० किलोमीटर प्रवास करून आश्रमात येऊन सेवा करणार्‍या साधिका सौ. मीनाक्षी (मीना) अंकुश धुमाळ (वय ५१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या आहेत, असे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घोषित केले.

या वेळी सौ. मीनाक्षी धुमाळ आणि त्यांचे पुत्र श्री. रूपेश अन् श्री. कल्पेश, तसेच सून सौ. मीनल कल्पेश धुमाळ आणि नातू चि. कृष्णा (वय ११ मास) उपस्थित होते. त्यांचे पती श्री. अंकुश धुमाळ हे बाहेरगावी असल्याने ते, तसेच सौ. धुमाळ यांच्यासमवेत सेवा करणारे काही साधक ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून उपस्थित होते. याविषयीचे भाववृत्त येथे विस्ताराने देत आहोत.

आरंभी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ऑनलाईन उपस्थित असलेल्या साधकांना ते साधनेच्या अनुषंगाने काय प्रयत्न करत आहेत, याविषयी सांगण्यास सांगितले. काही साधकांनी त्याविषयी त्यांचे अनुभवकथन केले. यानंतर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी सौ. मीनाक्षी धुमाळ यांनाही त्या करत असलेल्या साधनेच्या प्रयत्नांविषयी सांगण्यास सांगितले. यानंतर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सौ. धुमाळ यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केले.

श्री. अंकुश धुमाळ

या आनंदाच्या प्रसंगी सौ. मीनाक्षीताईंचे यजमान श्री. अंकुश धुमाळ यांचाही कंठ दाटून आला. ते म्हणाले, ‘‘माझे मन भरून आले आहे. गुरुच सर्वकाही करवून घेतात.’’

घर सांभाळून २२ वर्षे अखंडपणे रामनाथी आश्रमात सेवेसाठी येणार्‍या सौ. मीनाक्षी धुमाळ या सनातनमधील एकमेवाद्वितीय साधिका !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी काढलेले कौतुकोद्गार !

‘गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने आपण आपल्या साधनेचा लेखा (हिशेब) गुरुचरणी द्यायला हवा. आपल्या साधनेत किती जमा अन् किती खर्च झाले, हे जाणून घेण्यासाठी गुरुपौर्णिमा असते. भगवंताच्या हिशेबानुसार सौ. मीनाताईंच्या जन्म-मृत्यूच्या चक्राचा हिशेब गुरूंच्या कृपेने पूर्ण झाला आहे, म्हणजेच आज त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. त्यांनी गुरुसेवा करतांना स्वत:मध्ये परिवर्तन करून गुरूंचे मन जिंकण्यासाठी प्रयत्न केले. सौ. मीनाक्षी धुमाळ यांनी २२ वर्षे अखंडपणे प्रतिदिन घरून येऊन-जाऊन सेवा केली. उन्हाळा, पावसाळा अथवा हिवाळा ! त्यांनी कधीच कशाचीही तमा बाळगली नाही. तरुणांनी असे करणे वेगळे; पण एखाद्या गृहिणीने घर सांभाळून सेवा करणे कठीण असते. असे करणार्‍या सनातनमधील त्या एकमेवाद्वितीय साधिका असतील ! त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांनी याआधी प्रसारातही चांगल्या प्रकारे सेवा केली आहे. त्यांच्या यजमानांनीही त्यांना सेवा करण्यात सहकार्य केले.

सौ. मीनाक्षीताईंच्या प्रगतीमध्ये त्यांच्या यजमानांचा सिंहाचा वाटा आहे. एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले सौ. मीनाक्षीताईंना म्हणाले होते, ‘‘यजमानांनी तुम्हाला एवढे सहकार्य केले आहे की, तुमचे अर्धे पुण्य तुम्ही त्यांना द्यायला हवे.’’

सर्वकाही देवानेच करवून घेतले ! – सौ. मीनाक्षी धुमाळ

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सौ. मीनाक्षीताईंनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करताच सौ. मीनाक्षीताईंचा भाव जागृत झाला. त्यांच्या भावमय मनोगतात त्या कृतज्ञतापूर्वक म्हणाल्या, ‘‘मी काहीच प्रयत्न केलेले नाहीत. सर्वकाही देवानेच करवून घेतले आहे. देवाच्याच आशीर्वादामुळे सर्व शक्य झाले आहे.’’

सौ. मीनाक्षी धुमाळ यांनी सांगितलेले प्रयत्न !

सौ. मीनाक्षी धुमाळ

१. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने देवाने माझ्यात पालट करवून घेतले !

‘तीन वर्षांपूर्वी मी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवत असतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या होत्या, ‘‘आपल्याला प्रगती करायची आहे.’’ त्यांचे हे वाक्य माझ्या हृदयात कोरले गेले. याआधी कार्यपद्धतीनुसार सर्व साधकांनी सेवा कराव्यात, याकडे अधिक लक्ष असायचे; पण साधकांविषयी प्रतिक्रिया यायच्या. प्रक्रिया राबवल्याने साधकांना समजून घेण्याचे माझे प्रयत्न आणि उत्साहही वाढला. देवानेच माझ्यात पालट करवून घेतले.

२. प्रत्येक प्रसंगात व्यक्त करत असलेल्या कृतज्ञतेमुळेच सर्वकाही घडते !

मला आधी वाटायचे की, माझ्यात भाव नाही. गेल्या दीड वर्षांपासून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये माझा व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे घेत आहेत. प्रत्येक प्रसंगात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ लागले आहेत. कृतज्ञतेमुळेच सर्वकाही घडते, असे मला वाटते.’