मागील वर्षी रामनवमीच्या दिवशी चेन्नई येथील साधकांना आलेल्या श्रीरामाचे अस्तित्व जाणवणार्‍या अनुभूती !


१. सौ. कृत्तिका वरुण

१ अ. श्रीरामाचे स्मरण करत नैवेद्य सिद्ध करणे आणि श्रीकृष्णाला आरती ओवाळतांना श्रीरामाचे दर्शन होणे : २.४.२०२० या रामनवमीच्या दिवशी मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेले ‘श्री लक्ष्मीनारायणा’चे चित्र आणि त्याविषयीचा लेख वाचला. नंतर मी श्रीरामाचे स्मरण करत नैवेद्यासाठी खीर बनवली. नंतर माझे यजमान श्रीकृष्णाला आरती ओवाळत असतांना मला सूक्ष्मातून ‘श्रीकृष्णाने त्याच्या पाठीवर धनुष्यबाण धारण केले आहे’, असे दिसले. त्या वेळी मला क्षणभरासाठी श्रीकृष्णाच्या चित्रात श्रीरामाचे दर्शन झाले.

२. श्री. बालाजी कोळ्ळा

२ अ. नामजप करतांना सूक्ष्मातून हनुमान श्रीरामाची पाद्यपूजा करतांना दिसणे आणि श्रीरामाच्या मागे परात्पर गुरुदेवांचे दर्शन होणे : २.४.२०२० या दिवशी सकाळी उठल्यावर मला श्रीरामाचे सूक्ष्मातून दर्शन झाले. त्या दिवशी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी आम्हाला ११.३० वाजता श्रीरामाचा नामजप करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे मी नामजप करू लागलो. तेव्हा सूक्ष्मातून मला ‘हनुमान श्रीरामाची पाद्यपूजा करत असून मी श्रीरामाची आभूषणे आणि धनुष्यबाण व्यवस्थित करत आहे’, असे दिसले. नंतर श्रीरामाच्या पाठीमागे मला परात्पर गुरुदेवांचेही (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन झाले.’

२ आ. पाद्यपूजा झाल्यावर आलेली अनुभूती : पाद्यपूजा झाल्यावर हनुमानाने ‘श्रीरामाच्या पादुका माझ्या डोक्यावर ठेवल्या’, असे मला जाणवले. त्या क्षणी माझा भाव जागृत होऊन डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले आणि माझे शरीर थंड झाले. माझी ही भावावस्था ४० मिनिटे टिकून होती. मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार गेले १० वर्षांपासून साधना करत आहे. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मला प्रथमच अशी अवर्णनीय अनुभूती आली. त्या दिवशी मला ‘घरात श्रीरामतत्त्व कार्यरत आहे’, असे दिवसभर जाणवत होते.

२ इ. श्रीरामाचा नामजप करतांना हनुमानाचे सूक्ष्म अस्तित्व जाणवणे : एरव्ही मी जेव्हा श्रीरामाचा नामजप करतो, तेव्हा मला हनुमानाचे सूक्ष्म अस्तित्व तत्काळ जाणवते. मला झोपेत वाईट स्वप्ने पडल्यावर मी त्वरित श्रीरामाचा नामजप करतो. त्या वेळी ‘हनुमान माझ्या उशीजवळ आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसते.

३. सौ. सुगंधी जयकुमार

३ अ. रामनवमीच्या दिवशी नामजप करतांना ‘श्रीराम घरी पट्टाभिषेकासाठी येत आहे’, असा भाव निर्माण होऊन संपूर्ण वास्तू सूक्ष्मातून फुले आणि पुष्पहार यांनी सुशोभित झाल्याचे जाणवणे : रामनवमीच्या दिवशी ११.३० वाजता नामजपाला बसण्यापूर्वी मी नैवेद्यासाठी शिरा बनवला आणि सहकुटुंब आरती केली. त्यानंतर मी नामजप करायला बसले. तेव्हा ‘मला तुझ्या घरी बोलावणार नाही का ?’, असे परात्पर गुरुदेव मला विचारत आहेत’, असे मला जाणवले. त्या क्षणी ‘श्रीराम आमच्या घरी पट्टाभिषेकासाठी येत आहे’, असा भाव माझ्या मनात निर्माण झाला. त्या वेळी ‘संपूर्ण वास्तू सूक्ष्मातून फुले आणि पुष्पहार यांनी सुशोभित झाली असून पाद्यपूजेची सिद्धता झाली आहे’, असे मला जाणवले.

३ आ. परात्पर गुरुदेवांनी श्रीदेवी आणि भूदेवी यांच्यासमवेत श्रीरामाच्या रूपात दर्शन देणे अन् तिघांची पाद्यपूजा करून नैवेद्य अर्पण केल्यावर आशीर्वाद देऊन ते अदृश्य होणे : परात्पर गुरुदेवांनी मला सिंहासनारूढ श्रीरामाच्या रूपात दर्शन दिले. त्यांच्यासमवेत श्रीदेवी (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) आणि श्रीसत्शक्ति (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ) यासुद्धा आल्या होत्या. तिघांची पाद्यपूजा केल्यावर मी परात्पर गुरुदेवांसाठी नारळीभात, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजलीकाकूंसाठी शिरा आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंसाठी खीर या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला. सर्व साधकांना पिण्यासाठी पन्हे दिले. परात्पर गुरुदेव आणि सद्गुरुद्वयी यांनी आम्हाला आशीर्वाद दिला अन् ते अदृश्य झाले. त्यांच्या आसनांवर तुळशीपत्रे होती. त्यानंतर मी भावावस्थेतून बाहेर येऊन डोळे उघडले. तेव्हा दुपारचे ठीक १२ वाजले होते.