नागपूर येथील स्वामीधाममध्ये नितीन गडकरी यांच्या हस्ते संतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना

अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी संस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन

‘स्वामीधाम’मधील संतधामचे उद्घाटन करतांना (डावीकडून) आराधना परिवार तथा स्वामीधामचे अध्यक्ष दिनकर कडू, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आमदार मोहन माते, अक्कलकोट वटवृक्ष स्वामी मंदिर संस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे आणि आमदार टेकानंद सावरकर

सातारा, १६ (वार्ता.) – नागपूरमधील बेसा येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिर आराधना परिवार तथा स्वामीधाम येथे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील ४ संत आणि विठ्ठल यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच उद्घाटन अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी संस्थानचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी राज्याचे ‘श्री स्वामी समर्थ मंदिर आराधना परिवार’ तथा ‘स्वामीधाम’चे अध्यक्ष दिनकर कडू, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मोहन माते आणि आमदार टेकानंद सावरकर आदी मान्यवर, स्वामीभक्त आणि नागरिक उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

‘संतधाम’ येथे श्री विठ्ठलाची २१ फूट, शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डी येथील श्री साईबाबा यांची १४ फूट, संत तुकाराम महाराज आणि संत जनाबाई यांची प्रत्येकी ११ फूट उंच अशा४ मूर्तींचा समावेश आहे. यामुळे भाविकांना संतांची मांदियाळी अनुभवायला मिळणार आहे.

श्री स्वामी समर्थांनी सोलापूर, अक्कलकोट ते गाणगापूर हा रस्ता माझ्याकडून सेवा म्हणून करवून घेतला ! – नितीन गडकरी

‘स्वामीधाम’च्या माध्यमातून दिनकर कडू यांनी विदर्भात स्वामी भक्तीचा प्रसार आणि प्रचार अत्यंत सेवाभावी वृत्तीने चालवला आहे. दिनकर कडू यांच्या स्वामी सेवेतून प्रेरणा घेऊन अक्कलकोट येथे जाणार्‍या भाविकांची सेवा घडावी यासाठी सोलापूर अक्कलकोट ते गाणगापूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास प्राधान्य दिले. माझ्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांनी हा रस्ता सेवा म्हणून करवून घेतला, असे भावोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.

‘आराधना परिवारा’च्या माध्यमातून दिनकर कडू यांचा अखंड स्वामी सेवेचा वसा चालू आहे ! – महेश इंगळे

आराधना परिवाराचे अध्यक्ष दिनकर कडू यांनी शून्यातून विश्‍व निर्माण केले आहे. आज स्वामी दर्शनासमवेत भाविकांना इतर संतांचेही दर्शन होणार आहे. भविष्यात याठिकाणी भाविकांना दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय संयुक्त भक्तीसंगम अनुभवायला मिळणार आहे. ‘आराधना परिवारा’च्या माध्यमातून दिनकर कडू यांचा अखंड स्वामी सेवेचा वसा चालू आहे, असे गौरवोद्गार अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी संस्थानचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी काढले.