देशविदेशातील चित्रपट निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी गोव्यात यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप

अभिनेते आणि निर्माते विश्‍वजीत चटर्जी (सर्वांत उजवीकडे) यांना वर्षातील भारतीय व्यक्तीमत्व पुरस्काराने गौरवल्यानंतर डावीकडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल कोश्यारी आणि अमित खरे

पणजी, २४ जानेवारी (वार्ता.) – गोवा यापुढे ‘सन, सँड अँड सी’ यासाठीच नव्हे, तर विविध विकास प्रकल्पांसाठी नावाजलेले राज्य ठरणार आहे. गोव्याच्या विकासासाठी गोवा शासनाने अनेक प्रकल्प राबवले आहेत. शासनाने पर्यटन, इको-पर्यावरण ही क्षेत्रे वृद्धींगत करण्यासाठी कार्य केले आहे. देशविदेशातील चित्रपट निर्मात्यांना गोव्यात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी निमंत्रित करत आहे. ५२ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महोत्सवापेक्षा अधिक चांगल्या रितीने साजरा केला जाणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशाने २ लसींची निर्मिती केली आहे आणि यामुळे कोरोना नष्ट होऊन जग जिंकणार आहे, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आंचिम) समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत संबोधित करत होते. बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात हा समारोप सोहळा संपन्न झाला. या वेळी नामवंत अभिनेत्री झीनत अमान, गोवा मनोरजंन संस्थेचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. या वेळी इतरांचीही भाषणे झाली.

यंदाच्या ‘आंचिम’मध्ये इंडियन पॅनोरमा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभाग, होमेज, रेट्रोस्पेक्टिव्ह, सत्यजित रे श्रद्धांजली विभाग, गोमंतकीय विभाग, कंट्री फोकस, मिडफेस्ट आदी एकूण १६ विभागांतून १९० चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगभरातील १५ चित्रपटांची निवड करण्यात आली होती.

‘सुवर्ण मयुर’, ‘रौप्य मयुर’ आदी पुरस्कारांची घोषणा

महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. उत्कृष्ट चित्रपटासाठी ४० लाख रुपये रोख आणि ‘सुवर्ण मयुर’ पुरस्कार ‘डॅनिश वर्ल्ड वॉर २’वर आधारित ‘इंटू द डार्कनेस’ या चित्रपटाला घोषित करण्यात आला. हा चित्रपट नाझीच्या काळातील डॅनमार्क नागरिकांच्या भावनांवर प्रकाश टाकणारा आहे. महोत्सवातील १५ लाख रुपये रोख आणि ‘रौप्य मयुर’ पुरस्कार तैवानचे दिग्दर्शक चेननियन को यांच्या ‘द सायलंट फॉरेस्ट’ चित्रपटाला प्राप्त झाला आहे. उत्कृष्ट पुरुष अभिनेता पुरस्कार ‘द सायलंट फॉरेस्ट’ चित्रपटातील १७ वर्षे वयाचे अभिनेते झु चान यांना प्राप्त झाला, तर उत्कृष्ट महिला अभिनेत्री पुरस्कार ‘आय नेव्हर क्राय’ चित्रपटाच्या अभिनेत्या झोफिया स्टाफीज यांना प्राप्त झाला. या पुरस्कारांतर्गत रोख रक्कम, रौप्य मयुर आणि प्रमाणपत्र देण्यात येते. विशेष ज्युरी पुरस्कार बल्जेरियाचे दिग्दर्शक कमीन कालेय यांच्या ‘२०२० फिल्म फेब्रुवारी’ या चित्रपटाला प्राप्त झाला. या पुरस्कारांर्तगत १५ लाख रुपये, रौप्य मयुर आणि प्रमाणपत्र देण्यात येते.