पणजी, २२ जानेवारी (वार्ता.) – केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत आता बर्याच प्रमाणात सुधारणा होत आहे. त्यांना अतीदक्षता विभागातून आता ‘महनीय व्यक्ती’च्या खोलीत (वॉर्ड १२१ मधील खोली क्रमांक १) हालवण्यात आले आहे, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर पत्रकात पुढे म्हणतात, ‘‘केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या रक्तचाचण्यांचा अहवाल चांगला आला आहे. त्यांच्यावर ‘फिजिओथेरपी’ चालू आहे आणि त्यांना नेहमीचे जेवणही आता दिले जात आहे.’’ आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी २२ जानेवारी या दिवशी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या आरोग्याची चौकशी केली.