सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या सहवासात पुणे येथील सौ. वृंदा सटाणेकर यांना आलेल्या अनुभूती

फेब्रुवारी २०२४ मध्ये सद्गुरु नंदकुमार जाधव गुडघेदुखीवरील उपचारांसाठी काही दिवस पुणे येथे आले होते. त्या वेळी ते सौ. वृंदा सटाणेकर यांच्या घरी वास्तव्यास होते. त्या वेळी सद्गुरु काकांच्या सहवासात सौ. सटाणेकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

(सद्गुरु) नंदकुमार जाधव

१. सद्गुरु काकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

अ. ‘सद्गुरु काकांच्या प्रत्येक कृतीत सहजता असते.

आ. सद्गुरु काका मला माझ्या चुका अत्यंत प्रेमाने समजावून सांगायचे. त्यांच्याशी बोलल्यावर मला पुष्कळ शिकायला मिळून आनंद मिळायचा.

२. सद्गुरु काकांकडून शिकायला मिळालेली साधनेची सूत्रे

अ. साधना, म्हणजे प्रतिदिन करायचे अखंड प्रयत्न. साधना म्हणजे, ‘योग्य आचरण, योग्य कृती आणि योग्य प्रतिसाद’, हे अनमोल सूत्र मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

आ. योग्य पद्धतीने हात जोडून नमस्कार केल्यानेही आपल्यावरील अनिष्ट शक्तींचे आवरण न्यून होते.

इ. कधी कधी समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसतोे. तेव्हा श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांना शरण जाऊन ‘त्या व्यक्तीचे बोलणे ऐकण्याची क्षमता वाढू दे’, अशी प्रार्थना करायची.

ई. ‘मी कसा किंवा कशी आहे ?’ याचा सतत अंतर्मुख होऊन विचार करायचा. आपल्या मनाचा सतत अभ्यास करायचा.

उ. ध्येयाचा विसर पडला की, सातत्य रहात नाही. ‘हा आपला शेवटचा जन्म असणार आहे’, हे ध्येय ठेवून प्रयत्न करायचे.

ऊ. परिस्थिती कशीही असली, तरी साधना हेच प्राधान्य असायला हवे.’

३. सद्गुरु काका घरी आल्यावर झालेले त्रास

अ. ‘सद्गुरु काका आल्यावर प्रारंभी काय करायचे ? त्यांच्याशी काय बोलायचे’, याचे मला आकलन होत नव्हते.

आ. माझ्या शरिरावर सूज येऊन मला जडपणा जाणवत होता. मला पुष्कळ थकवा असायचा.

४. सद्गुरु काका घरी आल्यावर आलेल्या अनुभूती

अ. सद्गुरु काका आल्यानंतर माझे मन सतत उत्साही, आनंदी आणि सकारात्मक राहू लागले.

आ. माझ्या शरिरावर आलेली सूज पूर्णपणे नष्ट झाली.

इ. माझे शरीर हलके झाले. त्या वेळी मला ‘मी रामनाथी आश्रमात म्हणजे श्रीकृष्णाच्या गोकुळात आहे’, अशी अनुभूती येत असे.

ई. सद्गुरु काकांच्या ठिकाणी मला साक्षात् प.पू. गुरुमाऊलींचे अस्तित्व जाणवायचे.

उ. सद्गुरु काका असतांना घर एकदम प्रकाशमान झाल्याचे जाणवले. मला घरात शांतता आणि स्थिरता जाणवत होती. मला घरातील खोल्यांचे आकारमानही मोठे झाल्याचे जाणवले.

ऊ. सद्गुरु काका वास्तव्यास असलेल्या खोलीमध्ये कधी चंदनाचा, तर कधी दैवी सुगंध यायचा. काकांचे कपडे ठेवलेल्या खणातही दैवी सुगंध यायचा.

५. सद्गुरु काका घरी येऊन गेल्यानंतर झालेले पालट

अ. कुटुंबातील आम्हा सर्वांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित होऊ लागले.

आ. आमचा एकमेकांविषयी प्रेमभाव वाढला आणि आम्हाला इतरांना समजून घेता येऊ लागले.

इ. माझा मुलगा (श्री. जय सटाणेकर, वय २० वर्षे) आता प्रतिदिन नामजप आणि सारणीलिखाण करत आहे.

ई. ‘परिस्थिती स्वीकारणे आणि प्रसंगात स्थिर रहाणे’, असे प्रयत्न माझ्याकडून होऊ लागले.

उ. मला स्वतःकडून होणार्‍या चुकांविषयी खंत वाटू लागली.

ऊ. सद्गुरु काका घरून गेल्यावरही आम्हा कुटुंबियांना एक मासभर (महिनाभर) त्यांचे अस्तित्व जाणवत होते आणि जवळजवळ २ महिने सद्गुरु काकांचे कपडे ठेवलेल्या कपाटाच्या खणांमध्ये दैवी सुगंध येत होता.

गुरुदेवांच्या कृपेमुळे मला ही सूत्रे लिहिता आली. आम्हाला सद्गुरूंच्या सेवेची संधी दिली, त्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद्गुरु स्वाती खाडयेताई आणि सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. वृंदा सटाणेकर (सर्व सूत्रांचा दिनांक एप्रिल २०२४)