१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा रथ ओढण्याची सेवा मिळाल्याचे कळल्यानंतर कृतज्ञता वाटणे
‘मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी जायचे आहे’, हे कळल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटली की, ‘देवाने मला सेवेची संधी दिली आहे.’ रामनाथीला पोचल्यानंतर सेवेचे दायित्व असणार्या साधकाने ‘आमच्या सेवेचे स्वरूप काय असणार ?’, हे सांगितले. जेव्हा ते म्हणाले, ‘‘आपल्याला परम पूज्य गुरुमाऊलींचा रथ ओढण्याची सेवा मिळाली आहे’, तेव्हा हे ऐकून माझे मन भरून आले. पुष्कळ कृतज्ञता वाटली की, ‘देवाने आपल्याला एवढी मोठी संधी दिली आहे.’ त्यामुळे ही सेवा गुरुमाऊलीला अपेक्षित अशी करायची. सतत कृतज्ञताभावात रहायचे. माझ्याकडून गुरुदेवांना सतत प्रार्थना होत होती की, ‘गुरुदेव, तुम्हीच ही सेवा तुम्हाला अपेक्षित अशी करून घ्या.’ आणि सतत त्यांचे स्मरण होत होते.
२. सराव करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी रथाच्या दोरीने रथ ओढल्यानंतर काही क्षणांतच रथाचा भार हलका होणे
एकदा आम्ही १४ साधक रथ ओढण्याचा सराव करत होतो. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ तेथे उपस्थित होत्या. त्यांनी आमच्या समोरच रांगेमध्ये उभे राहून रथाची दोरी हातात घेऊन रथ ओढण्यास आरंभ केला. त्यांनी दोरी हातात घेतल्यावर काही सेकंदांतच रथ एवढा हलका झाला की, ‘तो एकदम सहज ओढला जात आहे’, असे वाटत होते. त्या वेळी आम्हाला पुष्कळ आश्चर्य वाटून चैतन्याच्या सामर्थ्याची अनुभूती घेता आली. तेव्हा लक्षात आले की, ‘ही सेवा आपल्याला शक्ती लावून करायची नाही, तर देवाला शरण जाऊन सतत भावस्थितीत राहून करायची आहे. तेव्हाच ती सेवा गुरुदेवांना आवडणार आहे.’
३. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी तीव्र शारीरिक त्रास होतांना सेवा करणे कठीण असल्याचे जाणवणे, त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले सेवा करून घेणार असल्याचा विचार आल्यावर त्रास न्यून होऊन सेवा करता येणे
ब्रह्मोत्सवाच्या दिवशी २० मिनिटांनी रथ ओढण्याची सेवा आरंभ होणार होती. अचानक मला पाठीचा आणि सायटिकाचा तीव्र त्रास चालू झाला. मला पाऊल उचलून पुढे टाकताच येत नव्हते. तेव्हा वाटत होते की, ‘आता मी रथ ओढण्याची सेवा करू शकणार नाही.’ दायित्व असणार्या साधकांना सांगूया की, ‘मला त्रास होत आहे. त्यामुळे मला सेवा करणे शक्य होईल, असे वाटत नाही.’ त्याच वेळी ‘देवाने ही एवढी मोठी संधी दिली आहे. माझ्या शरिराचे काय व्हायचे, ते होऊ दे. गुरुदेवच काय होईल, ते बघतील. त्रासाकडे लक्षच द्यायला नको’, असा विचार करून प.पू. डॉक्टरांना प्रार्थना केली आणि सेवेसाठी गेलो. गेल्यावर गुरुमाऊलीचे दर्शन झाले आणि गुरुमाऊलीच्या रथाची दोरी हातात घेऊन रथ ओढण्यास आरंभ केला. त्याच क्षणी मला होणारे सर्व त्रास पूर्णपणे दूर झाले.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवण्याचे महत्त्व लक्षात येणे
या वेळी लक्षात आले की, आपण गुरुदेवांवर केवळ श्रद्धा ठेवून त्यांच्या चरणी स्वतःला सोपवायला पाहिजे. ते सगळी काळजी घेतातच. गुरुमाऊली किती काळजी घेते आणि किती कृपा करते !’, हे या प्रसंगातून अनुभवायला मिळाले.
५. रथाचे वजन ५ टन असूनही तो ओढतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या ‘ब्रह्मोत्सवाच्या दिवशी रथाचे वजन पुष्कळ हलके जाणवेल’, या वाक्याची प्रचीती येऊन रथ हलका झाल्याचे जाणवणे
रथ ओढण्याची सेवा करतांना रथाचे काहीच वजन वाटत नव्हते. तो पुष्कळ हलका होता. रथाचे वजन पाहिले, तर ते पाच टन एवढे होते; पण ‘ते पाच टन वजन आहे’, असे कुणालाही जाणवतच नव्हते. रथ अगदी सहज ओढला जात होता. तेव्हा ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंनी सांगितलेले वाक्य आठवले. ‘प्रत्यक्ष रथ ओढण्याची सेवा असेल, त्या दिवशी रथाचे वजन पुष्कळ हलके जाणवेल.’ त्यांनी सांगितल्याप्रमाणेच झाले. त्यांचा संकल्पच कार्यरत झाला अन् आम्हाला अनुभूती घेता आली.
गुरुमाऊलीने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी) माझ्यासारख्या जिवाला या सेवेची अमूल्य संधी दिली. यासाठी श्रीमन्नारायणाच्या चरणी मी कितीही वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘मला सतत त्यांच्या कृपेस पात्र होता येऊन माझ्याकडून त्यांना अपेक्षित अशी साधना व्हावी’, अशी त्यांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’
– श्री. सचिन हाके, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |