सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दिव्‍य ब्रह्मोत्‍सव पुन्‍हा एकदा अनुभवता यावा, यासाठी दैवी बालकांच्‍या सत्‍संगात घेतलेले विविध भावप्रयोग !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव ११.५.२०२३ या दिवशी झाला. त्‍यानंतर ‘दैवी बालक आणि युवा साधक यांच्‍या सत्‍संगातील साधकांना पुन्‍हा एकदा तो दिव्‍य ब्रह्मोत्‍सव सूक्ष्मातून अनुभवता यावा’, यासाठी परात्‍पर गुरुदेवांच्‍या कृपेमुळे काही दिवस सत्‍संगात ब्रह्मोत्‍सवाच्‍या संबंधीचे भावप्रयोग घेण्‍यात आले. त्‍यामुळे दैवी सत्‍संगातील साधकांनी पुन्‍हा ती अवर्णनीय भावावस्‍था अनुभवली आणि कृतीच्‍या स्‍तरावर विविध भावप्रयत्नही केले. ते पुढे दिले आहेत.

१. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव साजरा झालेली ‘फर्मागुडी, फोंडा, गोवा येथील मैदानरूपी पुण्‍यवंत भूमी म्‍हणजे आपणच आहोत’, असा भाव ठेवून श्रीमन्‍नायणस्‍वरूप गुरुदेवांचा कोमल चरणस्‍पर्श अनुभवूया !

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा ब्रह्मोत्‍सव झालेले मैदान आणि ती भूमी खरंच पुण्‍यवंत आहेत. त्‍या भूमीला साक्षात् श्रीमन्‍नारायणाच्‍या ‘श्रीजयंत’रूपाचा चरणस्‍पर्श झाला आहे. ती भूमी म्‍हणजे आपणच आहोत’, असा भाव ठेवूया आणि आपणही नारायणाचा दिव्‍य चरणस्‍पर्श अनुभवूया. ती भूमी किती आतुर झाली असेल ना ! ‘कधी एकदा नारायणाचा चरणस्‍पर्श मी अनुभवेन’, असे तिला झाले असेल ! त्‍याचप्रमाणे आपणही आपल्‍या हृदयमंदिरात ती आतुरता अनुभवूया. साक्षात् त्रिभुवनाचा पालनकर्ता श्रीविष्‍णु या हृदयरूपी मैदानात येणार आहे. आपली आर्तता आता अधिकच वाढत आहे. आपण ती भूमी आहोत आणि नारायणस्‍वरूप गुरुदेव आपल्‍या हृदयमंदिरातच येणार आहेत. त्‍यामुळे आपले हे मनमंदिर आता पवित्र होऊ लागले आहे. ज्‍या क्षणी गुरुदेवांचा आपल्‍या मनरूपी मैदानाला चरणस्‍पर्श झाला, त्‍या क्षणी आपल्‍या आनंदाला ठावच राहिला नाही. आपल्‍या मनमंदिरात साक्षात् भगवंत आला आहे. आपण त्‍यांना सतत अनुभवूया. आपण श्रीमन्‍नारायणाच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करूया.’

कु. अपाला औंधकर

२. आपले अंतर्मन म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा दिव्‍य रथ आहे, हा अंतर्मनरूपी रथ सुंदर बनवण्‍यासाठी ‘स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निमूर्लना’ची प्रक्रिया करून त्‍यावर भगवंताप्रतीच्‍या भावाने सुंदर नक्षीकाम करूया आणि भावभक्‍तीचे विविध रंग देऊया !

‘आता ‘आपले अंतर्मन म्‍हणजे साक्षात् गुरुदेवांचा दिव्‍य सुवर्णरथ आहे आणि त्‍या मनरूपी रथात आपले प्राणप्रिय ३ गुरु (टीप) विराजमान झाले आहेत’, असा भाव ठेवूया !

दिव्‍य सुवर्णरथ बनवतांना कितीतरी कष्‍ट घ्‍यावे लागले. रथासाठी लाकूड मिळवणे, ते लाकूड तोडून त्‍याला सुंदर आकार देणे, त्‍यावर सुंदर नक्षीकाम करणे, त्‍याला रंग देणे इत्‍यादी. हे सर्व केल्‍यानंतर अतिशय सुंदर आणि प्रकाशमान असा दिव्‍य रथ सिद्ध झाला अन् त्‍या रथात प्रत्‍यक्ष परमेश्‍वराचे आगमन झाले. त्‍याचप्रमाणे आपले मन म्‍हणजे ‘दिव्‍य रथ’ आहे. त्‍या मनरूपी दिव्‍य रथामध्‍ये परमेश्‍वराचे आगमन होण्‍यासाठी आपल्‍यालाही कष्‍ट करावेे लागणार आहेत. मनरूपी रथ सुंदर बनवण्‍यासाठी ‘स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निमूर्लना’ची प्रक्रिया करायची आहे. आपल्‍याला ‘अहं’ ला तोडायचे आहे. आध्‍यात्मिक स्‍तरावरील विचारांनी मनाला आकार द्यायचा आहे. त्‍यावर भगवंताप्रतीच्‍या भावाने सुंदर नक्षीकाम करायचे आहे आणि भावभक्‍तीचे विविध रंग द्यायचे आहेत. त्‍यानंतरच आपले गुरुदेव त्‍या रथामध्‍ये विराजमान होणार आहेत. जेव्‍हा गुरुदेव आपल्‍या रथरूपी मनमंदिरात येतील, तेव्‍हा त्‍या रथरूपी मनमंदिराचे काहीच अस्‍तित्‍व राहिले नसून आपण गुरुदेवमय झालो आहोत. त्‍या रथात गुरुदेव आहेत, म्‍हणजे आपले मन त्‍यांच्‍याच इच्‍छेने पुढे पुढे जात आहे.’

(टीप : ३ गुरु म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ)

कु. प्रार्थना महेश पाठक

३. सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या ब्रह्मोत्‍सव फेरीतील ‘टाळ पथक आणि ध्‍वज पथक’ यांमधील साधक बनून त्‍यांचा भाव अनुभवूया !

‘आपण सर्वजण आता गुरुदेवांच्‍या रथोत्‍सवाच्‍या फेरीतील टाळ पथक आणि ध्‍वज पथक यांमधील साधक होऊया ! साक्षात् आदिनारायणाचे नामसंकीर्तन करत करत आता आपण हातांत टाळ आणि ध्‍वज घेऊन ‘श्रीमन्‍नारायण नारायण हरि हरि ।’ असे म्‍हणत पुढे-पुढे जात आहोत. आपण गुरुदेवांच्‍या नामात अखंड डुंबून गेलो आहोत. हे नारायणा, तुला आम्‍ही भजतो. हे लक्ष्मीनारायणा, तुझे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर आहेत. तू आमच्‍यासारख्‍या पामरांच्‍या संकटांचे निवारण करतोस. आमच्‍यातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून आम्‍हाला तुझ्‍या अस्‍तित्‍वाच्‍या शुद्ध ज्ञानधारेत चिंब भिजवत असतोस. आम्‍ही तुझ्‍या चरणी कृतज्ञ आहोत. यानंतर आपण म्‍हणतो, ‘हे अच्‍युता, तुला अनंत कोटी नमन ! हे जनार्दना, तुला आमचा भावपूर्ण नमस्‍कार !’ आपण आता ‘स्‍व’ चे अस्‍तित्‍व तर विसरलोच आहोत; परंतु भूतलावरही राहिलो नाही. आपली ही दिव्‍य फेरी साक्षात् वैकुंठातील एका रम्‍य मैदानात चालू आहे. तिथे अनेक देवी-देवता पुष्‍पवृष्‍टी करत आहेत. काही साधकांच्‍या मागे नारायणस्‍वरूप गुरुदेवांचा रथ आहे, तर काही साधकांच्‍या पुढे तो रथ आहे. याचा भावार्थ काय आहे, तर ‘गुरुदेव आपल्‍या पुढे आणि पाठी सदैव आहेत.’ आपण समष्‍टी सेवा करतांना ते आपल्‍या पाठीशी राहून आपल्‍याला ऊर्जा देऊन तेच सेवा करवून घेत आहेत, तर आपल्‍या पुढे राहून साधनेची योग्‍य दिशेने वाटचाल करवून घेत आहेत. किती अतूट नाते आहे आपले ! साक्षात् श्रीमन्‍नारायणच आपल्‍या पुढे आणि मागे सदैव आणि चिरंतन रहाणार आहेत’, असे वाटून आपण ‘हे श्रीहरि, तू किती सुंदर आहेस ! तू मुकुंद आहेस आणि तूच तो अंतर्यामीचा नारायण आहेस’, हे अनुभवत आहोत. आपले मन आता संपूर्णपणे श्रीहरिमय झाले आहे. आपला कृतज्ञताभाव जागृत झाला आहे.’

४. ब्रह्मोत्‍सव झाल्‍यानंतर ज्‍या गाडीतून गुरुदेव पुन्‍हा आश्रमात आले, ‘ती गाडी आपण आहोत’, असा भाव ठेवून ते भक्‍तीविश्‍व अनुभवूया !

‘आपले जीवन म्‍हणजे गाडीच आहे आणि त्‍याचे ‘स्‍टिअरिंग’ (चारचाकीची दिशा बदलण्‍यासाठी वापरायचे चाक) परात्‍पर गुरुदेवांच्‍या हातांत आहे आणि ते आपल्‍याला योग्‍य मार्गावर घेऊन जाणार आहेत. आपण कुठे चुकलो, तर ‘ब्रेक’ (गाडीची गती न्‍यून करण्‍याची कळ) दाबून ते आपल्‍याला चूक करण्‍यापासून थांबवणार आहेत. आपण करत असलेले व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधनेचे प्रयत्न पाहून ते आपल्‍याला ‘अ‍ॅक्‍सिलेटर’च्‍या (गाडीचा वेग वाढवण्‍यासाठी असणारी पायाने दाबण्‍याची कळ) वेगाने साधनेत पुढे घेऊन जाणार आहेत. आता आपण ते भक्‍तीविश्‍व अनुभवूया ! आपल्‍या कानांना ‘सर्वत्र गोविंद नाम संकीर्तनम् ! गोविंदा ! गोविंदा !’ हा अत्‍यंत भक्‍तीमय जयघोष ऐकू येत आहे. आपले मन श्रीहरीच्‍या दर्शनासाठी अत्‍यंत आतुर झाले आहे. आता सच्‍चिदानंद गुरुदेव त्‍यांच्‍या आसनावरून उठून त्‍या पांढर्‍या गाडीच्‍या दिशेने जात आहेत. त्‍या वेळी आपले मन अतिशय व्‍याकुळ झाले आहे. त्‍यांनी त्‍यांचा मुकुट अतिशय अलगदपणे काढून साधकांच्‍या हातांत दिला आहे. ते हळूवारपणे गाडीत प्रवेश करत आहेत. जणू ती गाडी धन्‍य होऊन तिचीही भावजागृती होत आहे. गाडी गुरुचरणांचा स्‍पर्श होण्‍यास अतिशय आतुर झाली आहे.’

५. प्रार्थना आणि कृतज्ञता

हे जगन्‍नाथा, हे कृपाळा, हे सच्‍चिदानंद गुरुदेवा, आपल्‍याच अनंत कृपेमुळे आम्‍हाला दैवी सत्‍संगाच्‍या माध्‍यमातून पुन्‍हा एकदा आपला ‘न भूतो न भविष्‍यति ।’ (यापूर्वी कधीही न झालेला आणि भविष्‍यात कधीही न होणारा) असा ब्रह्मोत्‍सव अनुभवायला मिळाला. या दैवी सत्‍संगात अनुभवलेली ही भावावस्‍था निराळीच होती. हे गुरुदेवा, आपल्‍या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– गुरुचरणी,

कु. अपाला औंधकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १७ वर्षे) आणि कु. प्रार्थना पाठक (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय १३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (२१.६.२०२३)

(‘धारिकेचे संकलन करतांना आम्‍ही हे भावप्रयोग केले. आम्‍हालाही पुन्‍हा ब्रह्मोत्‍सवातील ती अवर्णनीय भावावस्‍था अनुभवायला मिळाली. धारिकेचे संकलन करतांना भावजागृती होत होती.’- सौ. विद्या पाटील आणि श्रीमती साळुंके)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक