हिंदु धर्म हाच एक ‘धर्म’ या संज्ञेला पात्र आहे !

१. जगाचे सार धर्म असणे

धर्मादर्थः प्रभवति धर्मात्प्रभवते सुखम् ।
धर्मेण लभते सर्वं धर्मसारमिदं जगत् ॥

– वाल्मीकिरामायण, अरण्यकाण्ड, सर्ग ८, श्लोक २६

अर्थ : धर्मापासून संपत्ती प्राप्त होते. धर्मापासून सुख निर्माण होते. धर्माने सर्वकाही प्राप्त होते. धर्म हे सर्व जगाचे सार आहे.

२. माणसाला माणूस बनवणार्‍या धर्मास ‘धर्म’ आणि राक्षस बनवणार्‍या धर्मास ‘अधर्म’ असे संबोधावे !

दया, सत्य, बंधुप्रेम आणि माता-भगिनी कन्या यांचे पवित्र नाते पशूत कुठे आहे ? ते माणसात आहे; कारण माणसाला धर्म आहे. धर्मामुळे माणूस ‘माणूस’ झाला. ज्या धर्मामुळे माणसाचा राक्षस होतो, तो धर्म नसून अधर्म आहे; म्हणून माणसाने धर्माने वागावे. ‘धर्र्मं चर’ असा भारतीय संस्कृतीचा संदेश आहे.

३. अधर्माचे फळ विनाश असणे

व्यासमुनी म्हणतात, ‘मी दोन्ही हात उभारून सांगतो की, ज्या धर्मामुळे अर्थ आणि काम प्राप्त होतात, तो धर्म का पाळत नाही; पण माझे कोणीही ऐकत नाही.’ व्यवहारात माणसांना उलटा अनुभव येतो. अधर्माने पैसा आणि काम याची प्राप्ती होते, हे वरकरणी दिसत असले, तरी अधर्माचे फळ विनाश हेच आहे.

४. धर्म म्हणजेच अस्तित्व

धर्मामुळे मानवाला अस्तित्व आहे; म्हणून स्वामी चिन्मयानंद म्हणतात, ‘धर्म म्हणजे अस्तित्व. अग्नीचा धर्म जाळणे, पाण्याचा धर्म ओले करणे. त्यातच त्यांचे अस्तित्व असते; म्हणून मानवाचे अस्तित्व ज्यात आहे तो त्याचा धर्म. हे पाहिले म्हणजे इतर धर्म म्हणजे पंथ, संप्रदाय आहेत. हिंदु धर्म हाच एक ‘धर्म’ या संज्ञेला पात्र आहे.