आपण ‘युजफूल इडियटस्’ बनत नाही ना ?

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांना थप्पड मारणार्‍या सुरक्षारक्षिकेला ‘शिरो’ (SHero) बनवण्याचे काम लगेच चालू झाले आहे. सरकारी कर्मचार्‍याने कर्तव्यावर अन् ‘प्रव्होकड्’ (भडकावणे) स्थितीत असतांना असे वागणे चूक आणि अपराधी कृत्य आहे, कारण काहीही असले तरी ! त्यावर कायद्याने कारवाई व्हायची ती होईल; पण या घटनेवर एरव्ही स्वतःला गांधीवादी, पुरोगामी, स्त्रीवादी आणि उदारवादी  म्हणवून घेणार्‍या मंडळींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. तो आनंद सामाजिक माध्यमांवर उतू जातांना दिसला. आपण या विषयाचे समर्थन करतांना आपल्याच आधीच्या भूमिकांशी वैचारिक व्यभिचार करत आहोत, हे ते सोयिस्करपणे विसरले.

भाजप खासदार कंगना राणावत (डावीकडे) व कुलविंदर कौर (उजवीकडे)

त्यांच्या आनंदाचे कारण जिच्यावर आक्रमण झाले, ती भाजपची आहे आणि भारत तोडू इच्छिणार्‍या शक्तींविषयी तिची काही जाहीर मते आहेत. भाजपला लोकशाही मार्गाने हटवणे अजूनही न जमल्याचे दुःख मनात ठसठसत असल्याने आता  कुणीतरी भाजपवाल्याला ठोकले, याचा आनंद बहुधा त्यांना अधिक झाला. अशी कुणाची मते न पटणारी असतील, तर ती सप्रमाण खोडणे किंवा न्यायालयात दावा करणे, हे राज्यघटना संमत मार्ग; पण ते अवलंबण्याऐवजी हिंसक प्रतिक्रिया आणि त्याचे समर्थन हे सगळे साम्यवादी वळणाकडे जाणारे आहे.

१. नवसाम्यवादाची मांडणी

परंपरागत कामगार-मालक यांच्या शोषित-शोषक संबंधावर आधारीत ‘मार्क्सिजम’ची (मार्क्सवादी तत्त्वांची) मांडणी पहिल्या महायुद्धानंतर पालटत्या औद्योगिक स्थितीत फोल ठरायला लागली. त्या वेळी ‘निओ लेफ्टिजम्’ (नवसाम्यवाद) किंवा ‘कल्चरल मार्क्सिजम’ची (सांस्कृतिक मार्क्सवादाची) मांडणी चालू झाली. त्यात प्रमुख ४ गोष्टी सांगितल्या गेल्या.

क्रांतीच्या प्रचारासाठी समाजातील ‘व्होकल’ असणार्‍या (शब्दांत व्यक्त करू शकणारे) लोकांना स्वतःचे काम संपले की, त्यांनाही ‘शोषक’ ठरवून टाकणे. या प्रकारच्या लोकांना नवमार्क्सवादात ‘युजफूल इडियटस्’ म्हटलेले आहे.

अ. कुठल्याही प्रश्नांवर समाजात होणार्‍या आंदोलनांमध्ये घुसा. ती कह्यात घ्या. त्यात द्वेष आणि हिंसा यांना प्रोत्साहन द्या. त्याला शोषक-शोषित असा रंग द्या. जगभरात शांततेने चालणार्‍या (किंवा तसा प्रारंभ केलेल्या) आंदोलनांना भडकावणार्‍या संघटनांनी गेल्या काही वर्षांत केलेली हानी आपण पाहिलीच आहे. भारतातील शेतकरी आंदोलनातील भाषा, कृती कशा वळणावर गेल्या ? तेही सर्वांनी पाहिले.

श्री. अभिजित जोग

आ. प्रत्येक ठिकाणी ‘व्हिक्टीम कार्ड’ (पीडितांचे सूत्र) वापरा. विशेषतः ‘आपले’ आणि ‘ते’ यांच्या संघर्षात ‘आपल्यांनी’ मर्यादा ओलांडली असेल, तर त्यांच्यासाठी तात्काळ ‘व्हिक्ट्म कार्ड’ वापरा.

इ. द्वेष : व्यवस्थेमध्ये असलेले आणि व्यवस्थेच्या आधाराने शांतपणे जगू इच्छिणारे यांच्याप्रती द्वेष.

लेनिन म्हणतो, ‘‘We must hate. Hatred is the basis of Communism. Children must be taught to hate their parents if they are not communists.’’ (आपण द्वेष केला पाहिजे. द्वेष हा साम्यवादाचा आधार आहे. जर मुले साम्यवादी नसतील, तर त्यांच्या पालकांचा द्वेष करायला शिकवले पाहिजे.) ज्याचे टी शर्ट भारतात लोकप्रिय झाले होते, तो ‘चे गव्हेरा’ हा साम्यवादी नेता म्हणतो, ‘‘Pitiless hate against the foe.. hate that lifts the revolutionist above the natural limitation of man and make him an efficient, destructive, cool, calculating and cold killing machine ! (शत्रूविरुद्ध निर्दयी द्वेष, जो क्रांतीकारकाला माणसाच्या नैसर्गिक मर्यादेच्या वर उचलतो आणि त्याला एक कार्यक्षम, विनाशकारी, शांत, मोजणी आणि थंडपणे मारण्याचे यंत्र बनवतो.)

ई. नैतिकता वगैरे जगात काही नसते. आम्ही जी करू तीच योग्य कृती !

२. नवमार्क्सवादातील ‘युजफूल इडियटस्’ संकल्पना

सर्वांत महत्त्वपूर्ण, म्हणजे आपल्या विचारसरणीच्या/ क्रांतीच्या प्रचारासाठी समाजातील ‘व्होकल’ असणारे (शब्दांत व्यक्त करू शकणारे) लोक निवडणे. त्यांनी प्रत्येक संघर्षाला शोषक-शोषित लढ्यापर्यंत खेचावे. त्या निमित्ताने धर्म, कुटुंबव्यवस्था आणि राज्यव्यवस्था यांना धिक्कारावे. या व्यवस्थांमध्ये किंवा त्यांच्या बाजूने असणार्‍यांविरुद्ध बहिष्कार किंवा द्वेष पसरवावा, त्यांना खलनायक ठरवावे (कॅन्सल कल्चर). या लोकांना अशा अवस्थेपर्यंत घेऊन जाता येईल, असे वातावरण करणे. पुढे स्वतःचे काम संपले की, या लोकांनाही ‘शोषक’ ठरवून टाकणे. या प्रकारच्या लोकांना नवमार्क्सवादात ‘युजफूल इडियट्स’ म्हटलेले आहे आणि त्यांचा वापर खुबीने करून घेण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत.

३. … यातून आपण अराजकाकडे नेणार्‍या चळवळीतील ‘युजफूल इडियटस्’ बनत आहोत !

कुठल्याही प्रकरणानंतर ‘जसे होते तसेच’, या प्रकरणानंतरही रूढार्थाने साम्यवाद्यांचे ‘केडर’ (निवडक प्रशिक्षक व्यक्तींचा गट) नसलेले; पण ‘सिस्टिमविरोधी’ (व्यवस्थेचे विरोधी) काही ना काही तक्रारी असणारे लोक सक्रीय झाले. शेतकर्‍यांचे प्रश्न भारतात आहेतच. त्यासाठी संवैधानिक आंदोलने करणे काही गैर नाही; मात्र कंगनावरील आक्रमणाचे उदात्तीकरण करून आपण अराजकाकडे नेणार्‍या चळवळीतील ‘युजफूल इडियटस्’ बनत आहोत, हे काही त्यांच्या लक्षात येत नाही. (संदर्भ : ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’, लेखक : श्री. अभिजीत जोग)

लेखक : प्रसन्न पाटील

(साभार : फेसबुक)