साप्ताहिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करतांना स्वभावदोषांमुळे सेवेतील आनंद न मिळणे; पण अंतर्मुखता वाढल्यावर तीच सेवा इतरांना समजून घेऊन करतांना त्यातून आनंद मिळणे

‘गुरुदेवांच्या कृपेने मी मागील १० वर्षे गोवा राज्यात साप्ताहिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करत आहे. ती सेवा करतांना मला जाणवलेली सूत्रे आणि गुरुदेवांच्या कृपेने केलेले प्रयत्न येथे दिले आहेत.

सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी

१. आरंभी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संबंधित सेवा करतांना ‘साधना’ या भावाने सेवा न होणे, त्यामुळे ते कार्य होणे

मला साप्ताहिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा मिळाल्यावर आरंभी माझा ‘सेवा परिपूर्ण करणे, ही साधना आहे’, असा विचार नसायचा. केवळ ‘सेवेत चुका होऊ नयेत’, एवढाच मला ध्यास असायचा. ‘सेवेतील प्रत्येकच कृती गुरुदेवांना अपेक्षित अशी व्हायला हवी’, हा विचार नसल्यामुळे सेवा करतांना माझे स्वभावदोष आणि अहं कार्यरत असायचे अन् मला त्यांची जाणीव नसायची. त्यामुळे त्या सेवेतून साधना अल्प आणि कार्य अधिक होत होते.

२. ‘सहसाधकांकडून अपेक्षा करणे आणि इतरांना समजून न घेणे’ या स्वभावदोषांमुळे सेवेतून आनंद न मिळता सेवा केल्यावर थकवा येणे

देवद (पनवेल) येथून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे  वाहनातून आणले जात होते. मी त्यांच्याकडूनही ‘माझ्या नियोजनाप्रमाणे कार्य व्हायला हवे’, अशी अपेक्षा करत असे. ‘इतरांना समजून न घेणे’, या स्वभावदोषामुळे मला सेवा करतांना आनंद मिळत नव्हता. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेतील इतर साधकांकडूनही ‘त्यांनी बिनचूक सेवा करायला हवी’, अशी माझी अपेक्षा असायची. ‘साधक नेहमी अडचणी सांगतात. त्यावर त्यांना उपाय सांगितले, तरी ते त्या अनुषंगाने कृती करत नाहीत’, अशा विचारांमुळे मला सेवेतील आनंद घेता येत नव्हता.

टपालाने साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ पाठवण्याची सेवा (साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांच्या घड्या घालणे, त्यावर पत्ते चिकटवणे, टपाल कार्यालयात अंकांचे गठ्ठे ‘पार्सल’साठी देणे आणि त्याचे पैसे भरणे) करतांनाही माझ्या मनात सहसाधकांकडून अपेक्षेचे विचार असायचे. त्यामुळे सेवा केल्यावर मला आनंद तर मिळायचा नाहीच, उलट थकवा यायचा आणि विश्रांती घ्यावी लागायची.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने विविध माध्यमांतून साधनेविषयी मार्गदर्शन मिळाल्यामुळे अंतर्मुखता येणे

गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) मला ‘भक्तीसत्संग, शुद्धीसत्संग, सेवेसाठी मार्गदर्शन करणारे शिबिर, तसेच सद्गुरु आणि संत यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध झालेले मार्गदर्शन’, असे विविध सत्संग देऊन अंतर्मुख केले. गुरुकृपेने मला ‘प्रत्येक सेवा करतांना गुरुदेवांना कसे अनुभवायचे ? मी केवळ माध्यम असून कर्ता-करविता तेच आहेत’, याची जाणीव झाली. त्यांच्याच कृपेने माझ्याकडून तसे प्रयत्नही झाले. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

४. अंतर्मुख झाल्यामुळे सेवा करतांना दृष्टीकोन पालटल्यामुळे आनंद मिळणे

मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या कोरोना महामारीच्या काळात ‘साप्ताहिक सनातन प्रभात’शी संबंधित सेवा बंद होती. गुरुदेवांनी ‘ऑनलाईन’च्या (संगणकीय प्रणालीच्या) माध्यमातून वाचकांना जोडून ठेवण्याची सेवा उपलब्ध करून दिली. गुरुकृपेने ती सेवा करतांना माझ्याकडून सेवेतील आनंद अनुभवण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर पुन्हा ती सेवा प्रत्यक्ष चालू झाल्यावरही मला आनंद अनुभवता येत आहे. खरेतर सेवा त्याच आहेत; पण माझा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटल्यामुळे मला त्यातील आनंद अनुभवता येत आहे.

५. स्वतःमध्ये झालेले पालट !

५ अ. इतरांच्या सेवेतील अडचणी समजून घेतल्याने सेवेतील आनंद मिळणे : आताही देवद (पनवेल) येथून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे वाहनातूनच आणले जातात; पण आता मी ‘त्यांच्या नियोजनानुसार सेवा करणे, त्यांची अडचण समजून घेणे’, असे प्रयत्न चालू केले आहेत. त्यामुळे मला त्या सेवेतील आनंद अनुभवता येऊ लागला आहे.

५ आ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सेवा पहात आहेत’, असा भाव ठेवल्यावर तशी अनुभूती येणे : वर्गणीदारांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे पाठवण्यासाठी मी ते बांधत असतांना आश्रमातील संत किंवा सद्गुरु त्याच वेळी तिथून जात-येत असतात. ‘मी कशी सेवा करत आहे ?’, हे ते जाता-येता पहातात. ते तिथून गेल्यावर त्यांच्या माध्यमातून ‘गुरुदेवच माझी सेवा बघत आहेत’, असे मला जाणवायचे. मी तसा भाव ठेवू लागल्याने मला तशी अनुभूती घेता आली आणि अजूनही प्रत्येक आठवड्याला येत आहे.

५ इ. सेवा करतांना कृतज्ञताभाव ठेवून भावजागृतीचे प्रयत्न केल्यावर थकवा न येणे : टपालाने साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ पाठवण्याची सेवा करतांना ‘सहसाधकांमुळेच मी ही सेवा वेळेत पूर्ण करू शकत आहे’, याची जाणीव होऊन आता मला साधकांप्रती कृतज्ञता वाटते. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ला पत्ते चिकटवण्याची सेवा करतांना मी भाववृद्धी होण्यासाठी प्रयोग करते. ‘पत्ते अंकांना चिकटवतांना मी गुरुदेवांच्या चरणांना स्पर्श करत आहे, त्यांच्या चरणांवर फुले वहात आहे’, असा भाव ठेवते. गुरुदेवांच्या कृपेने माझ्याकडून असे प्रयत्न होऊ लागल्यावर ‘सेवा कधी पूर्ण होते’, तेही मला कळत नाही आणि थकवाही जाणवत नाही.

‘गुरुदेवांनी इथून पुढे माझ्याकडून अशीच सेवा करवून घ्यावी’, अशी त्यांच्या चरणी संपूर्ण शरण जाऊन प्रार्थना करते.’

– सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी, फोंडा, गोवा. (३.८.२०२३)