चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद हटवण्याची चित्रपट निर्मात्याची हमी
मुंबई – ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रसारणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने अनुमती दिली आहे. चित्रपटातील सर्व आक्षेपार्ह संवाद हटवण्याची हमी चित्रपट निर्मात्याने न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने वरील आदेश दिला. न्यायमूर्ती कमल खता आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या सुटीकालीन खंडपिठाने हा आदेश दिला.
१. ‘हमारे बारह’ या चित्रपटात मुसलमान समाजाचे चुकीचे चित्रीकरण करण्यात आले असून चित्रपटाच्या ट्रेलरमधील (चित्रपटाचा संक्षिप्त भाग) संवादांमुळे मुसलमान समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यास प्रतिबंध करावा’, अशी याचिका पुण्यातील अझर तांबोळी यांनी प्रविष्ट केली होती. (मुसलमान समाजाचे सत्य स्वरूप समोर आणणार्या चित्रपटावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करणारे मुसलमान ! – संपादक)
२. ६ जून या दिवशी खंडपिठासमोर झालेल्या सुनावणीत खंडपिठाने ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या ३ सदस्यांच्या समितीने हा चित्रपट पहावा आणि अहवाल द्यावा’, असे निर्देश दिले होते. त्या समितीमध्ये नागराज रेवणकर, इशरत सय्यद, निलांबरी साळवी यांचा समावेश होता. त्याप्रमाणे समितीच्या सदस्यांनी चित्रण पाहून अंतरीम निरीक्षण नोंदवले. अंतिम अहवाल देण्यासाठी १२ जूनपर्यंतचा वेळ मिळावा, अशी मागणी उच्च न्यायालयाला केली; पण ‘त्या अहवालासाठी चित्रपटाचे प्रदर्शन रोखू शकत नाही’, असे मत खंडपिठाने व्यक्त केले.
३. कर्नाटकात मात्र धार्मिक तेढ निर्माण होण्याचे कारण देत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.