‘अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ते शक्य करतील स्वामी’, या वचनाची प्रचीती देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ते शक्य करतील स्वामी ।’ असे प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्या पाठीशी होते, आहेत आणि सदैव असणार आहेत’, याची प्रचीती देणारे माझे काही अनुभव मी श्री गुरुचरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहे. हे अनुभवतांना श्री गुरूंनी माझ्याकडून साधनेचा प्रायोगिक भागही करून घेतला. जे घडले, ते सारे शब्दांत व्यक्त करणे कठीण असले, तरीही ‘सारेच तू दिलेले, काय मी अर्पू तुला’, अशी माझी स्थिती असल्याने माझी तोडक्या मोडक्या शब्दांतील कृतज्ञता आपण स्वीकारावी’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.

वर्ष २०१७ मध्ये श्री गुरुकृपेने आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर ‘साधना हेच यापुढे आमचे प्राधान्य असेल’, असे आम्ही निश्चित केले. त्या दृष्टीने आमचे एकेक पाऊल उचलायला आरंभ झाला. आमची मुलगी २ वर्षांची होत आल्यावर माझी पत्नी सौ. प्राजक्ता आणि कन्या कु. शौर्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आल्या. त्या दोघी येथे स्थिरस्थावर झाल्यावर मी रामनाथी (गोवा) येथे येण्याचे नियोजन करणार होतो. पुढे अशा काही घडामोडी घडल्या की, माझे इकडे येणे आपोआपच झाले. नंतर तळेगाव दाभाडे, पुणे येथील आमचे घर विकण्याचा माझ्या वडिलांचा मानस झाला. त्या दृष्टीने मी पुणे येथे गेलो असता संकटांची मालिकाच चालू झाली. 

श्री. विशाल पुजार

१. कुटुंबातील चारही सदस्यांना कोरोना होणे; मात्र श्री गुरूंनी मोठ्या संकटातून अलगद बाहेर काढणे : मार्च २०२१ मध्ये मी तळेगाव दाभाडे, पुणे येथील घर विक्रीसाठी गेलो असतांना आम्हाला (मी, पत्नी, मुलगी आणि वडील यांना) कोरोना झाला. गुरुकृपेने आमच्या त्रासाचे स्वरूप प्राथमिक अवस्थेतच लक्षात आले. तेव्हा आम्हाला नामजपादी उपायांसहित आयुर्वेदिय उपचार घरीच उपलब्ध झाले. श्री गुरूंनी आम्हाला मोठ्या संकटातून अलगद बाहेर काढले. मार्च २०२१ मध्ये पुणे येथे कोरोनाची स्थिती भयानक होती. अशा वेळी सर्वांना शारीरिक त्रास होऊनही गुरुदेवांनी आमचे प्रारब्ध सुखकर केल्याची अनुभूती आली.

२. पोटदुखीचा त्रास होणे

२ अ. अन्नाचा एकच घास खाल्ला, तरीही पोट जड होणे, ढेकरा येणे, असे त्रास होणे आणि ‘सोनोग्राफी’ केल्यावर ‘यकृताच्या रक्तवाहिनीत रक्ताची मोठी गाठ आहे’, असे आढळणे अन् त्यानंतर वैद्यकीय चाचण्या करायला जातांना ‘प्रत्येक वेळी गुरुदेव समवेत आहेत’, असे अनुभवणे : ऑक्टोबर २०२१ मध्ये मला पोटदुखीचा त्रास चालू झाला. घरगुती औषधाने तात्पुरता परिणाम होत असला, तरी १८ ऑक्टोबरपासून माझ्या त्रासाची तीव्रता वाढत गेली. मी अन्नाचा एक घास जरी खाल्ला, तरीही पोट पुष्कळ जड होणे, प्रचंड प्रमाणात ढेकरा येणे, कंबर आणि पाठ दुखणे, असे त्रास होत होते. आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे आणि आधुनिक वैद्य उज्ज्वल कापडिया यांना भेटल्यावर त्यांनी ‘सोनोग्राफी’ (विशिष्ट ध्वनीलहरींच्या साहाय्याने पोटातील अवयवांची चित्रे घेण्याची चाचणी) करून घायला सांगितली. ‘सोनोग्राफी’मध्ये ‘माझ्या यकृताच्या रक्तवाहिनीत रक्ताची मोठी गाठ झाली आहे’, असे आढळले. ‘सी.टी.स्कॅन’ (Computed Temography हे रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांचे छायाचित्र काढण्याचे तंत्रज्ञान आहे.) आणि त्यानंतर एंडोस्कोपी (शरिराच्या आतील भागांत नलिका घालून तेथील भागांची प्रत्यक्ष तपासणी करणे) इत्यादी चाचण्या झाल्या. मला प्रत्येक चाचणी करण्यासाठी मडगाव येथे जावे लागत होते. बाहेर कोरोनाची स्थिती भयावह असूनही ‘प्रत्येक वेळी गुरुदेव समवेत आहेत’, असे आम्ही अनुभवत होतो.

२ आ. ‘एंडोस्कोपी’ होत असतांना सूक्ष्मातून गुरुदेव दिसणे आणि ‘त्यांच्या हातातून चैतन्य शरिरात जात आहे’, असे जाणवणे : अन्य रुग्णांची ‘एंडोस्कोपी’ होतांना त्यांना होत असलेला त्रास पाहून मला भीती वाटत होती. प्रत्यक्षात माझी ‘एंडोस्कोपी’ करण्यासाठी मला पलंगावर घेतल्यावर मला सूक्ष्मातून गुरुदेव दिसले आणि ‘त्यांच्या हातातून चैतन्य माझ्या शरिरात जात आहे’, असे मला जाणवले. गुरुकृपेने कोणताही अधिक त्रास न होता माझी ‘एंडोस्कोपी’ झाली.

३. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची संधी मिळणे

३ अ. आश्रमात गेल्यावर ‘चैतन्याचा स्रोत मनोमयकोषात प्रवेश करत आहे’, असे अनुभवणे आणि ‘गुरुमाऊली त्रास शीघ्रतेने दूर करत आहेत’, असे जाणवणे : गाठी विरघळण्यासाठी मला प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी इंजेक्शन घ्यावे लागत असे. इंजेक्शन घेण्याच्या निमित्ताने माझे आश्रमात जाणे-येणे चालू झाले. ‘मला चैतन्य मिळावे’, यासाठी झालेले हे दैवी नियोजनच होते. प्रत्यक्षातही ‘ध्यानमंदिर, आश्रमाचा कानाकोपरा यांतून आणि भेटणार्‍या प्रत्येक साधकाच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात चैतन्याचा स्रोत माझ्या मनोमयकोषात प्रवेश करत आहे’, असे मी अनुभवले. ‘गुरुमाऊली माझा त्रास शीघ्रतेने दूर करत आहेत’, असे मला सातत्याने जाणवत होते.

३ आ. ध्यानमंदिरात बसून आत्मनिवेदन आणि नामजप करतांना ‘पंचमुखी हनुमान अन् देवता आम्ही तुझ्या समवेत आहोत’, असे सांगून आश्वस्त करत आहेत’, असे अनुभवणे आणि ‘गुरुमाऊली माझे प्रारब्ध संपवत आहेत’, असे जाणवणे : ध्यानमंदिरात बसून आत्मनिवेदन करतांना प्रत्येक वेळी ‘पंचमुखी हनुमान आणि देवता आम्ही तुझ्या समवेत आहोत’, असे सांगून आश्वस्त करत आहेत’, असे मी अनुभवत होतो. मी ध्यानमंदिरात अनेक वेळा मनाची निर्विचार स्थिती अनुभवली. ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना मला पुष्कळ जांभया येऊन माझ्यावरील त्रासदायक आवरण दूर होत असे. ‘माझे त्रास आणि माझ्यावरील आवरण गुरुमाऊली नष्ट करत आहेत, माझे प्रारब्ध संपवत आहेत’, असे मला प्रत्येक वेळी जाणवत होते.

४. साधकांचे धिराचे बोल साहाय्यकारी आणि श्रद्धा वृद्धींगत करणारे ठरणे

४ अ. साधकांचे मायेचे बोल : श्री. संदीप शिंदे यांनी मला सांगितले, ‘‘काहीही त्रास असला, तरीही चिंता करू नकोस. गुरुदेव पाठीशी आहेत.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला पुष्कळ उभारी आली आणि माझे आंतरिक बळ वाढायला साहाय्य झाले. श्री. महावीर श्रीश्रीमाळ यांनी माझा त्रास दूर होण्यासाठी मंत्रजप मिळण्यासाठी साहाय्य केले. त्यांनी मला ‘स्वयंसूचना सत्रे आणि आत्मनिवेदन करणे आणि नामजपादी उपाय कसे वाढवता येतील ?’, यासंदर्भात निरनिराळी सूत्रे सुचवली. श्रीमती रजनी नगरकरकाकूंनी पाठीवर हात फिरवून ‘‘प.पू. गुरुदेव आहेत. सर्व व्यवस्थित होईल’’, असे सांगितल्याने मन कृतज्ञतेने भरून आले.

४ आ. आश्रमातील आधुनिक वैद्यांचे लाभलेले साहाय्य : आधुनिक वैद्य उज्ज्वलदादा आणि  आधुनिक वैद्य मराठेकाका यांनी माझे बोलणे शांतपणे ऐकून घेऊन आवश्यक ते साहाय्य केले अन् माझ्यावरील ताण दूर केला. ‘गुरुदेव प्रत्येक साधकाच्या माध्यमातून माझी काळजी घेत आहेत’, याची मला क्षणोक्षणी अनुभूती येत होती. माझे ‘सी.टी.स्कॅन’ करायला जातांना आधुनिक वैद्य मराठेकाकांनी आधीच तेथील आधुनिक वैद्यांशी बोलून त्यांना कल्पना दिली. आधुनिक वैद्य उज्ज्वलदादाने ‘सी.टी.स्कॅन’ करण्यासाठी जातांना ‘‘वाहनाची सोय आहे का ?’’, असे विचारले. तेव्हा गुरुदेवांनी माझे दायित्व घेतले असल्याची अनुभूती मला पुनश्च आली. आधुनिक वैद्य भिकाजी भोसले यांनी त्यांच्या एका आजाराच्या वेळी ते गुरुकृपेने लवकर ठीक होण्याच्या संदर्भात त्यांची अनुभूती सांगितल्यावर माझी श्रद्धा वृद्धींगत व्हायला साहाय्य झाले. गुरूंनी मला दिलेला हा पुनर्जन्म ईश्वरी कार्यासाठी अर्पण करण्याचा विचार माझ्या मनात दृढ झाला.

४ इ. रुग्णालयात जातांना श्री. प्रकाश मराठे श्रीकृष्णाचा जयघोष करत असणे आणि सौ. शालिनी मराठे (पू. (कै.) सौ. शालिनी मराठे) यांचे बोलणे ऐकून साधकाला कृतज्ञता वाटणे अन् त्याचा भाव जागृत होणे : आम्ही चारचाकी गाडीने पणजी येथील ‘मणिपाल’ रुग्णालयात जातांना श्री. प्रकाश मराठेकाका (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७९ वर्षे)-काकू (आता पू. (कै.) सौ. शालिनी मराठे) आमच्या समवेत होते. काका सातत्याने श्रीकृष्णाचा जयघोष करत होते. काकू म्हणाल्या, ‘‘आपले खरे डॉक्टर म्हणजे प.पू. गुरुदेव ! ते सगळ्या डॉक्टरांचे डॉक्टर आहेत. तुमचे काम व्यवस्थित होईल. निश्चिंत मनाने जाऊन या.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला कृतज्ञता वाटली आणि माझा भाव जागृत झाला. गुरुदेवांनी आम्हाला रुग्णालयात जातांना आणि येतांना मराठेकाका-काकूंचा सत्संग दिला. आम्ही रुग्णालयात जातांना खरेतर दुसरे साधक आमच्या समवेत येणार होते; मात्र ‘ईश्वरी नियोजनाप्रमाणे सर्व होत आहे’, याची अनुभूती मला पुन्हा आली.

५. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा लाभलेला सत्संग : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची भेट झाली, त्या वेळी माझ्या शारीरिक त्रासाची तीव्रता अल्प झाली होती. त्यांनी सांगितले, ‘‘प्रारब्ध आनंदाने आणि साधनेकडे लक्ष देत भोगावे.’’ त्यांचे बोलणे माझ्या मनावर कोरले गेले. त्यांनी मला आश्रमात येऊन स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवायला सांगितली. ‘गुरुदेव आपला हात सोडत नाहीत’, याची मला पुन्हा प्रचीती आली.

६. आधुनिक वैद्यांचे साहाय्य लाभणे : मला होत असलेल्या शारीरिक त्रासामुळे माझ्या मनात नकारात्मक विचार येत असत. याविषयी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितल्यावर माझ्या मनातील विचार न्यून होत असत. भावसत्संगानंतर मनाचा उत्साह वृद्धींगत होत असे. मनात विचारांची शृंखला चालू झाल्यावर आधुनिक वैद्यांचे साहाय्य घेऊन प्रयत्नरत रहाण्यासाठी संघर्ष चालू असायचा.

७. मी सूक्ष्मातून गुरुदेवांच्या चरणांशी बसून नामजपादी उपाय करत असे. मी गुरुदेवांना आत्मनिवेदन करत असतांना ते मला ‘भिऊ नकोस. मी आहे. तुला काहीही होणार नाही’, असे सांगत असल्याचे अनुभवत होतो.

८. अचूक नाडीपरीक्षण करणार्‍या वैद्या अपर्णा महांगडे ! : ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी’, या वचनाची प्रचीती मला आली. ३ मासांनी म्हणजे फेब्रुवारी २०२२ मध्ये माझे पुन्हा ‘सी.टी.स्कॅन’ केले. या अहवालाची वैद्यकीय भाषा माझ्यासाठी अनाकलनीय असल्याने मी काही दिवस ताणाच्या स्थितीत होतो. नंतर वैद्या अपर्णा महांगडे यांच्याशी बोलल्यावर त्यांनी सकारात्मक पालट असल्याचे सांगून दिलासा दिला. त्यांनी केलेले अचूक नाडीपरीक्षण विस्मयकारी आहे. मी या काळात आयुर्वेदाची महानताही अनुभवली. वैद्या अपर्णाताई मला नेहमी सांगत असत, ‘‘गुरुदेव आहेत आणि तुमचा त्रास दूर होणार आहे. गुरुदेवांच्या कृपेने तुम्ही ठीक व्हाल.’’ त्यांनी अशी शाश्वती दिल्याने माझे मन कृतज्ञतेने दाटून आले.

९. मणिपाल रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी ‘पर्यायी  नीला सिद्ध होऊन रक्तपुरवठा पूर्ववत चालू झाला असल्याने त्रास उणावला आहे’, असे सांगून ‘ही देवाची कृपा आहे’, असे पुनःपुन्हा सांगणे : मी अहवाल दाखवण्यासाठी ‘मणिपाल’ रुग्णालयातील रक्तविकार तज्ञांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘पर्यायी नीला (collateral veins) सिद्ध होऊन रक्तपुरवठा पूर्ववत चालू झाला आहे. त्यामुळे त्रास उणावला आहे.’’ त्या आधुनिक वैद्यांनी ‘‘हे सर्व देवाच्या कृपेने झाले’’, असे आवर्जून पुनःपुन्हा सांगितले. माझ्यासाठी ही केवळ आणि केवळ गुरुकृपाच आहे.

१०. कृतज्ञता आणि प्रार्थना : श्री गुरुंप्रती कृतज्ञता शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही. ‘जिथे स्वामीचरण, तिथे न्यून काय’, असे मला वाटते. श्री गुरुकृपेने मला पुनर्जन्म लाभला आहे. ‘माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण ईश्वरी सेवेतच रुजू व्हावा. तसा विचार आणि कृती माझ्याकडून श्री गुरूंनी करून घ्यावी’, अशी गुरुचरणी आर्त भावाने प्रार्थना आहे. ‘या प्रसंगात जेव्हा माझ्या मनाची स्थिती दोलायमान झाली, मन चिंता आणि भय यांनी अस्थिर झाले, तेव्हा मी गुरुचरणांपासून दूर जात होतो’, याबद्दल मी क्षमायाचना करतो. ‘गुरुदेव, आपण माझ्या समवेत क्षणोक्षणी असणारच आहात’, ही माझी श्रद्धा आपणच बळकट करावी आणि मला आपल्या चरणांशी स्थिर करावे’, अशी आपल्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विशाल पुजार, ढवळी, फोंडा, गोवा. (५.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक