मालवण – कोकण समुद्र किनारपट्टीवर २५ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने दिला आहे. त्यामुळे आता पर्यटन हंगामात जलक्रीडा प्रकारांना आळा बसणार आहे.
२४ मे या दिवशी तारकर्ली येथे नौका बुडून झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी मालवण येथे भेट देऊन पहाणी केली. या वेळी बंदरनिरीक्षक आर्.जे. पाटील उपस्थित होते.
२५ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे किल्ला प्रवासी वाहतूक संघटनेने समुद्रातील वातावरणानुसार प्रवासी वाहतूक करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे; मात्र मुदतवाढ देण्याचा अधिकार वरिष्ठ कार्यालयाकडे असल्याने ‘त्याविषयी कार्यालय निर्णय घेईल’, असे कॅप्टन नाईक यांनी सांगितले.
‘बंदीच्या कालावधीत कोणत्याही पर्यटन व्यावसायिकांनी जलक्रीडा व्यवसाय चालू केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.