सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारची दडपशाही निंदनीय ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

विधान परिषदेतील राज्यपालांचे अभिभाषण

भगतसिंह कोश्यारी

मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्राच्या सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेच्या हक्कांसाठी उभे रहाण्याचा शासनाचा निर्धार आहे. बेंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना आणि बेळगावमधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेकल्याचे कृत्य याचा महाराष्ट्र शासन तीव्र निषेध करते. विवादग्रस्त सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारने  केलेली दडपशाहीची कृत्ये निंदनीय आहेत, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या अभिभाषणात केले. राज्यपालांचे हे अभिभाषण विधान परिषदेच्या पटलावर ठेवण्यात आले.

या भाषणात राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील कोरोनाच्या संकटकाळात सरकारने राबवलेल्या उपाययोजना आणि आरोग्याच्या सुविधा यांविषयी सविस्तर माहिती दिली. मिशन ऑक्सिजन स्वावलंबनच्या अंतर्गत राज्यात एकूण १ सहस्र ८७० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून नवीन ११४ ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प राज्यात उभारण्यात येणार आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशनुसार कोरोनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या राज्यातील १ लाख ४० सहस्र रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.  राज्यात ‘इलेक्ट्रीक वाहन’ धोरणाच्या अंतर्गत आघाडीच्या उद्योग समूहांकडून ९ सहस्र कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे प्रस्ताव आले आहेत. यातून अनुमाने १० सहस्र नागरिकांच्या रोजगारांची निर्मिती होईल, असे राज्यपालांनी सांगितले.