‘७० ब’च्या दाव्याचा निकाल बाजूने देण्यासाठी लाच घेतांना राजापूर नायब तहसीलदार यांना अटक

अशा लाचखोरांना केवळ अटक, नव्हे तर त्यांची सर्व संपत्ती जप्त केल्यास लाचखोरीला थोडा तरी आळा बसेल !

राजापूर – पतीच्या नावावर असलेल्या ‘७० ब’च्या दाव्याच्या निकाल स्वत:च्या बाजूने देण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच घेतांना येथील प्रभारी निवासी नायब तहसीलदार अशोक गजानन शेळके (वय ५८ वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १६ फेब्रुवारी या दिवशी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण ताटे, साहाय्यक फौजदार संदीप ओगले, पोलीस हवालदार विशाल नलावडे, संतोष कोळेकर, शिपाई राजेश गावकर, हेमंत पवार यांनी ही कारवाई केली आहे.

तक्रारदाराच्या पत्नीच्या ‘नावे ७० ब’चा दावा प्रविष्ट करण्यात आला आहे. याचा निकाल बाजूने देण्यासाठी अशोक शेळके यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी तक्रारदारांकडे १५ सहस्र रुपयांची मागणी केली होती. यात तडजोड करुन १० सहस्र रुपये ठरवण्यात आले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा अनुमती मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण (९८२३२३३०४४), पोलीस निरीक्षक प्रवीण ताटे (८०५५०३४३४३) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.