|
नालासोपारा, २६ जानेवारी (वार्ता.) – वसई आणि विरार या शहरांमध्ये गोवंशियांच्या वाढत्या हत्या आणि अनधिकृत पशूवधगृहे यांच्या विरोधात २६ जानेवारी या दिवशी उपोषणाची अनुमती मागणार्या येथील हिंदुत्वनिष्ठांना नोटीस बजावून कारवाई करण्याची चेतावणी पोलिसांनी दिली आहे.
येथील हिंदुत्वनिष्ठ राजेश पाल यांनी जिल्हाधिकार्यांना ई-मेलने पाठलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘वसई-विरार भागांत होत असलेल्या गोहत्या आणि अनधिकृत पशूवधगृहे यांच्या विरोधात २८ जानेवारी या दिवशी ‘ऐच्छिक बंद’ करून ‘महापालिकेला घेराव’ घालण्यात येणार होता; मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे हा बंद आणि घेराव पुढे ढकलण्यात येत आहे; परंतु महापालिकेच्या क्षेत्रात वाढलेल्या गोहत्या आणि अनधिकृत मांस विक्री यांच्या विरोधात २६ जानेवारी या दिवशी झेंडावंदन कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी ३ कार्यकर्ते एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहोत.’ पाल यांनी हा ई-मेल राज्यपालांसह मुख्यमंत्री, राज्याचे सचिव, पालघरचे जिल्हाधिकारी, मुंबईचे पोलीस आयुक्त यांना पाठवला होता.
त्यावर पालघरचे अप्पर जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवून राजेश पाल यांच्या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करून त्यांना उपोषण करण्यापासून परावृत्त करण्यात यावे, असे आदेश दिले होते; मात्र पाल यांच्या तक्रारीवर पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तर उलट पोलिसांनी राजेश पाल यांच्यासह दिप्तेश पाटील आणि स्वप्नील शहा या उपोषणाला बसणार्या धर्माभिमान्यांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे (जमावबंदीच्या आदेशाच्या उल्लंघनाच्या प्रकरणी कावाई करण्याची) कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटिसीमध्ये पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २७ जानेवारीपर्यंत शहरात मनाई आदेश लागू करण्यात आल्याचेही म्हटले आहे. (गोतस्करांना मोकळे रान आणि गोरक्षकांना दमदाटी असे पोलिसांचे धोरण आहे, हेच यावरून लक्षात येते. ही स्थिती पालटण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक) या नोटिसीमध्ये पुढे म्हटले आहे, ‘आक्रोश मोर्च्यामुळे कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव होण्यास साहाय्य होईल, अशी कृती आपल्याकडून किंवा आपल्या कार्यकर्त्यांकडून झाल्यास किंवा शहरात एखादी अप्रिय घटना घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर या प्रकरणी तुम्हाला आणि तुमच्या सहकार्यांना उत्तरदायी धरून वरील नोटिसीचा भंग केल्याने कारवाई करण्यात येईल’, वास्तविक पहाता केवळ ३ कार्यकर्ते शांततेत लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे स्पष्ट करूनही पोलिसांनी अशा प्रकारे कारवाई करण्याची नोटीस बजावणे अनाकलनीय आहे; मात्र अशी नोटीस बजावण्यात आली असली, तरी हिंदुत्वनिष्ठ त्यांच्या मतावर ठाम असून उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.