अभाविप साजरा करणार भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ! – विशाल जोशी, जिल्हा अभियान प्रमुख, सांगली

पत्रकार परिषदेत माहिती देतांना विशाल जोशी (मध्यभागी), तसेच अन्य

सांगली, १४ ऑगस्ट (वार्ता.) – विश्‍वगुरु भारत १५ ऑगस्ट २०२१ ला स्वातंत्र्याची ७४ वर्षे पूर्ण करून ७५ व्या वर्षांत पर्दापण करत आहे. हा दिवस सर्व भारतियांच्या दृष्टीने गौरवाचा आणि अभिमानाचा आहे. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असून १५ ऑगस्ट २०२१ या दिवशी एक तिरंगा-एक कार्यकर्ता-एक गाव, या अभियानाच्या माध्यमातून विविध स्थानांवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अभियान प्रमुख श्री. विशाल जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. जोशी पुढे म्हणाले, या अभियानाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यामधील विविध गाव, खेडी, वस्ती मधील सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी ध्वजारोहण, भारतमाता पूजन, तिरंगा फेरी, घराघरावर तिरंगा अशा विविध उपक्रम/कार्यक्रम यांचे आयोजन करत आहे. हे अभियान जिल्ह्यातील १११ गावांतील ४ सहस्र ६६६ स्थानांवर साजरा करण्यात येणार आहे. येणार्‍या वर्षभरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आणि उपक्रम यांचे आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.