कोकण रेल्वेची लाखो रुपयांची तांब्याची तार चोरल्याच्या प्रकरणी तिघांना अटक आणि पोलीस कोठडी

कोकण रेल्वे

कुडाळ – कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी वापरल्या जाणार्‍या तांब्याच्या तारेची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणाचे अन्वेषण करत असतांना पोलिसांनी रत्नागिरी येथून ५ लाख रुपयांची ८८० किलो वजनाची तार कह्यात घेतली. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी १४ लाख ८२ सहस्र रुपयांची तार कह्यात घेतली आहे, तसेच गोदामाचा व्यवस्थापक, भंगारवाला आणि अन्य एक, अशा तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

कोकण रेल्वेच्या तांब्याच्या तारेची चोरी

या प्रकरणी पोलिसांनी ३ संशयितांना कह्यात घेतले आहे. ‘एल् अँड टी’ हे आस्थापन कोकण रेल्वेच्या रोहा ते वेर्णा (गोवा) या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम करत आहे. या कामासाठी वापरण्यात येणारी तांब्याची तार मोठ्या प्रमाणात चोरीस गेली होती. ‘एल् अँड टी’ आस्थापनाच्या गोदामातील पर्यवेक्षकाने (सुपरवायझरने) ‘कोकण रेल्वेच्या कुडाळ रेल्वेस्थानकात ठेवलेली तांब्याची तार झाराप स्थानकाजवळ चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी नेतो’, असे सांगितले; मात्र ती तार झाराप येथे न नेता थेट रत्नागिरी येथे नेली.

रत्नागिरी येथील पोलिसांना याविषयी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी २  संशयितांसह मुद्देमाल कह्यात घेतला. गोदामाच्या व्यवस्थापकाने १ सहस्र ५५३ किलो वजनाची अनुमाने ९ लाख ८२ सहस्र रुपये मुल्याची तांब्याची तार चोरून नेली, असे प्रथमदर्शनी उघड झाले होते. त्यानंतर कुडाळ येथील पोलिसांना कुडाळ रेल्वेस्थानकातून तांब्याच्या तारेची २ रिळे (बंडल्स) चोरीस गेल्याची माहिती मिळाली. यानुसार कुडाळ पोलिसांनी भंगार व्यावसायिक फुरखान सीरामुद्दीन मलीक याच्याकडे कसून चौकशी केली. त्या वेळी त्याने १ रीळ असल्याचे मान्य केले. यानंतर पोलिसांचे पथक रविवार, ४ जुलैला रत्नागिरी येथे संशयितांना घेऊन गेले. या वेळी भंगारवाला मलीक याच्या रत्नागिरी, मिरजोळे एम्.आय.डी.सी. येथील गोदामात असलेली तार कह्यात घेण्यात आली. तार विकणे सोपे व्हावे; म्हणून तारेच्या मोठ्या एका रिळाऐवजी तारेची छोटी ३१ रिळे बनवून ठेवली होती. ही तार रत्नागिरी येथे नेण्यासाठी वापरलेले टेम्पो वाहन पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या तारेची वाहतूक करण्यासाठी संशयितांनी ‘एल् अँड टी’ आस्थापनाचे बनावट शिक्के आणि लेटरहेड यांचा वापर केला होता. त्यामुळे तारेची वाहतूक करणे सोपे झाल्याचे अन्वेषणात उघड झाले. (बनावट कागदपत्रे कोणत्याच तपासणीत उघड झाली नाहीत का ? यात सहभागी सर्वांवर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)