पाणीटंचाईच्या झळा !

उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे भूमी कोरडी पडून पाणीटंचाई भासू लागली आहे. राज्यातील अनेक विभागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशांना भटकावे लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण झाली, तरी सर्वच सरकारे जनतेच्या मूलभूत आवश्यकताही पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहेत, हे वास्तव नाकारून चालणार नाही. राज्यातील नाशिक, नागपूर, अमरावती, ठाणे आणि पुणे या विभागांतील ८ जिल्ह्यांमधील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

गत काही वर्षांमध्ये राज्यात पावसाचे प्रमाण अल्प होते. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत होती; मात्र शासनाच्या प्रयत्नांतून आणि लोकसहभागातून अनेक ठिकाणी जलसंधारणाची कामे पूर्ण झाली. त्यातच गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने भूजल पातळी वाढली. त्यामुळे विहिरी आणि कूपनलिका (बोअरवेल) यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले; मात्र रब्बीच्या पिकांसाठी पाण्याचा उपसा झाल्याने भूजल पातळी खालावली. परिणामी राज्यात मार्चमध्येच पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले. सध्या ५२ गावे आणि १२९ वाड्या-वस्त्यांना ५९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे भविष्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्यास पाणीटंचाई वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गतवर्षी ६० हून अधिक गावे आणि ११० हून अधिक वाड्या-वस्त्यांना शासकीय आणि खासगी यंत्रणेकडून ८७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला गेला. यामध्ये सर्वाधिक पाणीटंचाई संभाजीनगर विभागातील ३४ गावे ४ वाड्या-वस्त्यांना ४० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला गेला होता; मात्र या वर्षी संभाजीनगर विभागात अद्याप एकही टँकर चालू झालेला नाही.

गत वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात टँकरची संख्या घटली असली, तरी वाढलेल्या भूजल पातळीचा विनियोगही झालेला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे भ्रमात न रहाता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने उपयोग करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करून त्याचे योग्य नियोजन करणे, आवश्यक ते निर्बंध लादणे अपरिहार्य आहे. पाण्याच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केल्यास येणार्‍या काही मासांत नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, हे निश्‍चित !
– राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा