भारताच्या लसीला परदेशातूनही मान्यता

नवी देहली – भारतात १६ जानेवारीपासून कोरोनावरील लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेक यांच्या ‘कोव्हिशील्ड’ लसीचे आणि भारत बायोटेक अन् आय.सी.एम्.आर्. यांनी बनवलेल्या ‘कोव्हॅक्सीन’ लसीचे डोस नागरिकांना दिले जात आहेत.

आता झिम्बाब्वे या देशाने ‘कोव्हॅक्सीन’ या लसीला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतात विकसित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सीन लसीला मान्यता देणारा झिम्बाब्वे हा जगातील पहिला देश ठरला आहे. झिम्बाब्वेमधील भारतीय दूतावासाने लवकरात लवकर ही लस पुरवणार असल्याचे म्हटले आहे.

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी कोव्हॅक्सीन ही लस ८०.६ टक्के प्रभावी असल्याची माहिती भारत बायोटेक आणि आय.सी.एम्.आर्. यांनी दिली आहे.