गोव्यात इयत्ता १० वीचा निकाल ९४.५१ टक्के

उत्तीर्णांमध्ये मुलींची सरशी

प्रतिकात्मक चित्र

पणजी, २६ एप्रिल (वार्ता.) – गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९४.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी २६ एप्रिलला पत्रकार परिषदेत दिली. या वेळी विद्यादत्त नाईक, भारत चोपडे आणि रिमा मडगावकर उपस्थित होते.

भगीरथ शेट्ये म्हणाले, ‘‘या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनी सरस कामगिरी केली आहे. यंदा उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी ९६.५१ टक्के आहे, तर उत्तीर्ण झालेल्या मुलांची टक्केवारी ९४.३७ आहे. या वर्षी परीक्षेला एकूण २० सहस्र ६१८ विद्यार्थी बसले होते, त्यांपैकी १९ सहस्र ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  विद्यार्थी त्यांचा निकाल gbshse.in आणि results.gbshsegoa.net या संकेतस्थळांवर पाहू शकतील. याखेरीज विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक ‘डीजीलॉकर’ सारख्या डिजिटल व्यासपिठावरून डाऊनलोड करता येईल.’’

१७८ शाळांचा निकाल १०० टक्केः फोंडा तालुक्यात सर्वाधिक शाळा

गोवा शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीच्या निकालात राज्यातील १७८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक २९ शाळा फोंडा तालुक्यातील असून त्याखालोखाल तिसवाडी तालुक्यातील २३, सासष्टी तालुक्यातील २२ आणि बार्देश तालुक्यातील १७ शाळांचा समावेश आहे. डिचोली तालुक्यात १४ आणि केपे आणि मुरगावमधील प्रत्येकी ११ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.

दिव्यांग (विकलांग) विद्यार्थ्यांचा निकाल ९८.७३ टक्के

यंदा या परीक्षेला ५४३ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत एकूण ५५० दिव्यांग विद्यार्थी बसले होते, त्यांपैकी ५४३ जण उत्तीर्ण झाले असून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ९८.७३% इतकी प्रभावी राहिली आहे.’’