अयोध्येत श्रीराममंदिरावर ध्वजारोहण !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – आज अयोध्यानगरी भारतीय सांस्कृतिक क्षेत्रातील एका उच्च बिंदूची साक्षीदार बनली आहे. संपूर्ण भारत आणि संपूर्ण विश्व राममय आहे. अद्वितीय समाधान, असीम कृतज्ञता आणि अपार अलौकिक आनंद आहे. शतकांपासूनच्या जखमा भरून येत आहेत. शतकांच्या वेदना आज शांत झाल्या आहेत. शतकानुशतके केलेला संकल्प आज सिद्धीस जात आहेत. ५०० वर्षांपूर्वीच्या यज्ञाची आज पूर्णाहुती होत आहे. आज भगवान श्रीरामाच्या गर्भगृहात अनंत ऊर्जा, दिव्य-भव्य मंदिरात रामदरबार प्रतिष्ठापित झाला आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ते श्रीराममंदिरावरील धर्मध्वजाच्या ध्वजारोहण सोहळ्यात बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष नृत्यगोपालदास महाराज, कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली सूत्रे
१ सहस्र वर्षांसाठी भारताचा पाया पक्का करायचा आहे !
श्रीराममंदिरामध्ये श्रीरामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली, तेव्हा मी ‘श्रीराममंदिर ते रामराज्य’ या विषयावर चर्चा केली. आपल्याला येत्या १ सहस्र वर्षांसाठी भारताचा पाया पक्का करायचा आहे. वर्तमानाच्या समवेतच भावी पिढ्यांविषयी विचार करायचा आहे. आपण नव्हतो, तेव्हाही हा देश होता, पुढेही रहाणार आहे. आपण एक जिवंत समाज आहोत. त्यामुळे आपल्याला दूरदृष्टीने काम करायचे आहे. आपल्याला प्रभु श्रीरामाकडून शिकायचे आहे. त्यांचे व्यवहार आत्मसात करायचे आहेत.
धर्मध्वज युगायुगांपर्यंत प्रभु श्रीरामाची शिकवण मानवजातीपर्यंत पोचवेल !
ही धर्मध्वजा केवळ ध्वज नाही, तर भारतीय सभ्यतेच्या पुनर्स्थापनेचे प्रतीक आहे. हा ध्वज वर्षांनुवर्षे पाहिले गेलेल्या स्वप्नांचे साकार स्वरूप आहे. येणारी अनेक शतके हा धर्मध्वज प्रभु श्रीरामांच्या आदर्शांचा उद्घोष करेल. ‘सत्यमेव जयते’, हा उद्घोष हा धर्मध्वज करेल. ‘प्राण जाए पर वचन न जाए’, यासाठी हा ध्वज प्रेरणा देईल. विश्वास, कर्म आणि कर्तव्य याला प्राधान्य द्यायला शिकवेल. भेद-भावापासून मुक्ती आणि समाजात शांती प्रस्थापित करेल. आपण असा समाज बनवू जिथे गरिबी नसेल, लाचारी नसेल. हा धर्मध्वज युगायुगांपर्यंत प्रभु श्रीरामाची शिकवण मानवजातीपर्यंत पोचवेल, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी योगदान देणारे भक्त, कारागिर, योजनाकार, वास्तूकार सर्वांना प्रणाम करतो, अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.

अनेकांचे आत्मे तृप्त झाले असतील ! – प.पू. सरसंघचालक
हा दिवस सर्वांसाठी अर्थपूर्ण आहे. अनेकांनी प्रयत्न केले, आयुष्य वाहिले. आज त्यांचे आत्मे तृप्त झाले असतील. अशोक सिंघल (विश्व हिंदु परिषदेचे दिवंगत अध्यक्ष) यांनाही आज शांती लाभली असेल. महंत रामचंद्र दास महाराज, डालमिया आणि अनेकांनी अथक परिश्रम करून प्राणर्पणही केले, अशी कृतज्ञता प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांच्या मार्गदर्शनात व्यक्त केली.
मंदिर उभारण्याची शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण !
ते पुढे म्हणाले की,
ध्वजारोहणानंतर मंदिर उभारण्याची शास्त्रीय परंपरा विधिवत पूर्ण झाली आहे. रामराज्याचा ध्वज जो कधीकाळी अयोध्येत फडकत होता आणि जगभर शांततेचा संदेश देत होता, तोच ध्वज आज पुन्हा शिखरावर प्रतिष्ठित होतांना आपण पाहिला. राममंदिराची प्रक्रिया आज पूर्णत्वास पोचली. ही परंपरा, हे ज्ञान आणि ही संरक्षणात्मक छाया जगभर पोचवण्याचे कार्य भारताने आज नव्याने चालू केले आहे. आज आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करण्याचा दिवस आहे. आपण पाहिलेले स्वप्न आणि पूर्वजांची आकांक्षा याहूनही अधिक भव्य रूपात साकार झाली आहे.
भगवा ध्वज धर्माचे प्रतीक ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
श्रीराममंदिरावरील धर्मध्वजारोहण सोहळा, ही एका मोठ्या यज्ञाची पूर्णाहुती आहे. विवाहपंचमीचा शुभमुहूर्त या सोहळ्याला पावन बनवत आहे. अनेक पिढ्यांची प्रतीक्षा या भव्य श्रीराममंदिराच्या रूपाने साकार झाली आहे. श्रीराममंदिरावरील भगवा ध्वज हे धर्माचे प्रतीक आहे. हे विकसित भारताच्या संकल्पनेचेही प्रतीक आहे. संकल्पाला कोणताही विकल्प (पर्याय) नाही. गेल्या ११ वर्षांत पालटणारा भारत सर्वांनी पाहिला आहे. विकास आणि वारसा यांचा समुच्चय सर्वांनी पाहिला आहे, अशी भावना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या वेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, गेल्या ५०० वर्षांत साम्राज्ये, पिढ्या पालटल्या; परंतु श्रद्धा अढळ राहिली. रा.स्व. संघासारख्या संघटनेच्या हाती कमान आली आणि ‘रामलल्ला हम आयेंगे, लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे’, हे नारे घुमू लागले. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली रामराज्याच्या पुनर्स्थापनेची दिव्य अनुभूती आज जग घेत आहे. श्रद्धेच्या नव्या युगात आपण प्रवेश करत आहोत. प्रत्येक धर्मावलंबिसाठी हा आत्मगौरवाचा दिवस आहे. धर्मपथ, रामपथ, भक्तीपथ, ८४ कोस परिक्रमा भक्तांच्या श्रद्धेला नवा सन्मान देत आहे. महर्षि वाल्मीकि विमानतळ भक्तांनी आंतरराष्ट्रीय सुविधा देत आहेत. स्मार्ट सिटीच्या रूपात अयोध्या समोर येत आहे.
Subscribe to our YouTube Channel
विशेष संपादकीय:आता रामराज्याचा धर्मध्वज फडकवा!



