‘मी अनेक वर्षे व्यष्टी साधनेचे प्रयत्न करत होते आणि त्यासंबंधी आढावा देत होते. त्याविषयी चिंतन केल्यावर माझ्याकडून व्यष्टी साधनेच्या संदर्भात होणार्या चुका माझ्या लक्षात आल्या. मी त्या चुकांतून शिकून व्यष्टी साधनेचे प्रयत्न चालू केले. त्यानंतर मला माझ्यात चांगले पालट झाल्याचे जाणवले. व्यष्टी साधनेच्या आढाव्याविषयी माझे झालेले चिंतन आणि माझ्यात झालेले पालट पुढे देत आहे.
१. व्यष्टी साधनेचा आढावा देतांना लक्षात आलेल्या चुका आणि शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ. ‘औपचारिकता आणि प्रतिमा जपणे’ या स्तरांवर आढावा देणे : मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी लिहावयाची सारणी अन् चिंतनसारणी एक औपचारिकता म्हणून लिहित होते. मी ‘दिखावा करणे (आपण नसलेले दुसर्याला भासवणे) आणि प्रतिमा जपणे’ यांसाठी आढावा देत होते. ‘आढावासेवकांनी पुढे काहीच प्रश्न विचारायला नको’, या उद्देशाने मी चिंतन सारणीत सांगितलेली आदर्श संख्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे. काही वेळा अपेक्षित संख्या झाली नाही, तर माझ्याकडून अपेक्षित संख्येच्या जवळपासची संख्या सांगितली जायची.
१ आ. मी स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी आढावा देत असल्यामुळे ‘खोटे बोलणे, चुकांचे गांभीर्य कमी करून सांगणे, प्रसंग मुद्देसूद न सांगणे, काही गंभीर चुका लपवणे’, अशा प्रकारच्या चुका माझ्याकडून व्हायच्या.
१ इ. कृृतीच्या स्तरावरील चुका सांगणे : मी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात केवळ कृतीच्या स्तरावर झालेल्या चुका सांगायचे. मी माझ्या मनाच्या स्तरावरील चुका सांगण्याचे टाळल्यामुळे माझ्या मनाची प्रक्रिया योग्य प्रकारे होत नव्हती. त्यामुळे मला घडलेल्या प्रसंगांमध्ये स्वभावदोषांच्या मुळापर्यंत जाता येत नव्हते.
१ ई. मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर चुकांचा आढावा देणे
१ ई १. स्वतःच्या चुकीसाठी परिस्थिती आणि समोरील व्यक्ती यांना दोषी ठरवणे : मी केवळ मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर व्यष्टी साधनेचे प्रयत्न करत होते. माझ्याकडून चूक झाल्यावर मी बुद्धीचा वापर मनाला योग्य दिशा देण्यासाठी न करता ‘परिस्थिती आणि समोरील व्यक्तीची कशी चूक आहे आणि मी कशी बरोबर आहे ?’, हे दाखवण्यासाठी केला जायचा. त्यामुळे त्यानंतरही मी चुकीच्या कृती करत असे.
१ ई २. चूक अर्धवट सांगून ती लपवण्याचा भाग होणे : ‘आढाव्यात प्रसंगाविषयी कितपत सांगायचे आहे ?’, हे मी बुद्धीने ठरवायचे. प्रसंगात झालेल्या चुकीविषयी अर्धवट सांगायचे आणि काही गोष्टी लपवण्याचाही भाग व्हायचा. चुकीमुळे झालेली हानी आणि तिचा परिणाम ठाऊक असूनसुद्धा मी त्याविषयी कधीच सांगायचे नाही.
१ ई ३. साधनेत बुद्धी अनावश्यक कार्यरत असणे : अजून एक मोठा अडथळा, म्हणजे व्यष्टी आढावा देतांना मनाच्या सहभागापेक्षा बुद्धीचा सहभाग अधिक असायचा. यामुळे माझ्या साधनेची हानी आणि चुका झाल्या, उदा. मी प्रत्येक विषय बुद्धीने हाताळत असल्याने व्यष्टी साधना, सेवा किंवा अन्यत्रही माझी बुद्धी कार्यरत होत असे.
१ उ. भविष्यकाळातील विचारांमुळे वर्तमानातील आनंद घेता न येणे आणि मनावर सतत ताण असणे : कुठलाही प्रसंग किंवा चूक झाल्यावर ‘आढावासेवक मला काय प्रश्न विचारणार आणि मला काय उत्तर द्यायचे आहे ?’, अशी माझ्या विचारांची शृंखला चालूच असायची, म्हणजे माझी बुद्धी सतत कार्यरत असायची. त्यामुळे सतत विचारांमध्ये राहिल्यामुळे मला वर्तमानातील आनंद घेता यायचा नाही आणि मनावर सारखा ताण असायचा.
१ ऊ. आढावा चालू असतांना माझा बर्याच वेळा अन्य साधकांच्या प्रसंगांतून शिकण्याच्या भाग नसायचा. मी माझ्या आढाव्याविषयी अतीविचार करत विचारांच्या कोशात रहायचे.
१ ए. जेव्हा व्यष्टी साधनेचा आढावा रहित व्हायचा, तेव्हा मला हायसे वाटायचे; कारण आढाव्यात चुका सांगण्याविषयी माझ्या मनावर ताण आणि भीतीसुद्धा असायची. (क्रमश:)
– दंतवैद्या (सौ.) संगीता श्रीकांत चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२३)
याच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/820080.html