पुणे – पुण्याची सांस्कृतिक ओळख पालटू देणार नाही, चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. सध्या शहरामध्ये चालू असलेल्या अपप्रकारांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन यांच्या हालचाली चालू आहेत. संबंधित बारचे मालक, चालक आणि अन्य काही लोक यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही पोलीस अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे. या पद्धतीने पोलिसांनी कडक कारवाई करत शहरातील सर्व अवैध गोष्टींना आळा घालावा, अशी मागणी भाजपच्या खासदार डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.
डॉ. (सौ.) कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षाच्या एका महिला पदाधिकार्यांनी अबकारी खात्यातील अधिकार्यांवर आरोप केले होते. त्यांनी त्याचा पाठपुरावा केला का ? केवळ आरोप केले की झाले, असे नसते. ते आता गप्प का बसले आहेत ?, असे जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले, ते पोलीस अधिकारी आणि अबकारी अधिकारी यांची चौकशी करून ते दोषी असतील, तर त्यांच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे; पण ते दोषी नसतील, तर खोटे आरोप करणार्यांवरही कारवाई झाली पाहिजे.