वाहतूककोंडी टाळण्यासाठीची उपाययोजना !
पुणे – सिंहगडावर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. सुटीच्या दिवशी घाटामध्ये शेवटच्या टप्प्यातील वाहतूक टाळण्यासाठी वन विभागाने गडावर सोडण्यात येणारी वाहतूक ही टप्प्याटप्प्याने सोडण्याचे नियोजन केले आहे. याविषयी वन विभागाने ‘घेरा सिंहगड वन व्यवस्थापन समिती’ला सूचना केल्या आहेत.
१६ जून या दिवशी सिंहगड घाटातील शेवटच्या टप्प्यात वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे ४ घंट्यांहून अधिक वेळ वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवण्यात आला होता. सिंहगड घाटातील वाहतुकीचे नियमन ‘घेरा सिंहगड वन व्यवस्थापन समिती’ करते. वाहतूककोंडीमुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अधिकाधिक पर्यटकांना गडावर जाता यावे, यासाठी वाहतूककोंडी कशी टाळता येईल ? असे नियोजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गडावर जाणारी वाहने कोंढणपूर नाका येथे थांबवणार. त्याच वेळी गडावरील वाहनतळावरून वाहने खाली येतील. कोंढणपूर नाका येथून वाहने गडावर सोडल्यावर वाहनतळावरून एकही वाहन खाली येणार नाही, असा प्रयोग करण्यात येणार आहे. अशा सूचना वन विभागाने ‘घेरा सिंहगड वन व्यवस्थापन समिती’ला दिलेल्या आहेत.